राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीसोबत जाणार नाही -राजू शेट्टी

माजी खा. राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली
राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; महाविकास आघाडीसोबत जाणार नाही -राजू शेट्टी

प्रतिनिधी / मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही विचार नसून स्वतंत्रपणे सहा जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट ही केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची ती भूमिका आहे. हुकूमशाहीच्या विरोधात जे सोबत येतील ते महाविकास आघाडीत असतील, असे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

माजी खा. राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र राजकीय आघाडीबाबत आपली कोणतीही चर्चा झालेली नसून आपण स्वतंत्रपणेच निवडणूक लढणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबद्दल जोपर्यंत महाविकास आघाडीकडून काही स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत कुठलाही विचार करणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

उद्धव ठाकरेंसोबतची भेट राजकीय विषयावर नव्हती, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भेटल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी अदानी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू केली आहे. केंद्र सरकारने अदानीवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्याने सोयाबीनला भाव नाही. सन २००० मध्ये चार हजार भाव होता. आज २०२३ उलटून गेला तरी तोच भाव आहे. सोयाबीनच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे. अदानी उद्योग समूह सिंधुदुर्गात २१०० मेगावॅटची वीजनिर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागातील जनतेला शेतीला कमी पाणी मिळणार आहे. या विरोधातही आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील जनतेने एकत्र मिळून हा लढा उभारला पाहिजे. त्यासाठी आम्ही संघर्ष समिती देखील स्थापन केली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

हातकणंगले जागेसाठी चर्चा करण्यासाठीच भेट!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे येथे ठाकरे गटाला सक्षम उमेदवार हवा आहे. मात्र, सध्या तरी धैर्यशील माने यांना लढत देऊ शकेल असा सक्षम उमेदवार ठाकरे गटाकडे दिसत नाही. त्यासाठी राजू शेट्टी पर्यायी उमेदवार असू शकतात. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला किंवा ते महाविकास आघाडीत सामील झाले, तर त्यांना चांगले पाठबळ मिळू शकते, याची कल्पना राजू शेट्टी यांना आहे. त्यामुळे या जागेवरून चर्चा करण्याच्या दृष्टीने राजू शेट्टी यांनी ठाकरे यांची भेट घेतली असावी, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. यावरून पुन्हा ते महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in