शेअर मार्केटमधील ‘बिग बुल’ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्वांत मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी सकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांना काही आठवड्यांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता; मात्र प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या ‘अकासा एअर’ या विमान सेवेचे उद्घाटन झाले होते.
ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राकेश झुनझुनवाला यांना काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्जही देण्यात आला; मात्र रविवारी सकाळी ६ वाजता पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
५ जुलै १९६०ला जन्मलेले झुनझुनवाला मुंबईत लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडील प्राप्तिकर खात्यात अधिकारी होते. किशोर वयातच शेअर बाजारात गुंतवणूक करण्याकडे त्यांचा ओढा वाढला. दिवसभराच्या बातम्यांचा शेअर बाजारावर नेमका कसा परिणाम होतो, याकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला त्यांचे वडील त्यांना द्यायचे. सिडनहॅम कॉलेजमध्ये शिकत असतानाच झुनझुनवाला यांनी १९८५ पासून शेअर बाजारात पैसा गुंतवण्यास सुरुवात केली. राकेश झुनझुनवाला यांनी अवघ्या पाच हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची आजघडीला एकूण संपत्ती सहा अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ४५,३२८ कोटी रुपये इतकी आहे. त्यांची सर्वाधिक गुंतवणूक ही टाटा समूहाच्या टायटन कंपनीमध्ये आहे. तसेच स्टार हेल्थ इन्श्युरन्स, मेट्रो ब्रँड्स आणि कॉनकॉर्ड बायोटेक सारख्या कपन्यांमध्येही झुनझुनवाला यांची गुंतवणूक आहे. १९८६ मध्ये झुनझुनवाला यांनी एका कंपनीचे पाच हजार शेअर खरेदी केले. त्यांनी हे शेअर प्रत्येकी ४३ रुपयांनी खरेदी केले होते; पण तीन महिन्यांत या शेअरचे मूल्य वाढून १४३ रुपये झाले होते. एवढ्या कमी काळात तीनपटीपेक्षा अधिक परतावा मिळाल्याने झुनझुनवाला यांचा आत्मविश्वास आढला.
राकेश झुनझुनवाला यांना भारताचे ‘वॉरेन बफे’ असे म्हटले जायचे. बफे यांनी वयाच्या अवघ्या ११व्या वर्षी शेअर खरेदी केली होती आणि १३व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा कर भरला होता. त्यामुळे झुनझुनवाला यांना नेहमी भारताचे ‘वॉरेन बफे’ म्हटले जाते; मात्र झुनझुनवाला यांना ही तुलना फारशी आवडत नव्हती. ‘संपत्ती असो, यश असो वा परिपक्वता, सर्वच बाबतीत बफे माझ्यापेक्षा खूप पुढं आहेत,’ असं मत झुनझुनवाला यांनी व्यक्त केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “राकेश झुनझुनवाला एक ध्येयनिष्ठ, पराभूत न होणारी व्यक्ती होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आर्थिक जगामध्ये अमिट ठसा उमटवला आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांप्रति माझ्या संवेदना आहेत. ओम शांती.”