मुंबईत आजपासून क्लायमेट वीक! अंतराळवीर राकेश शर्मा, शुभांशू शुक्ला एकाच मंचावर; सचिन तेंडुलकरसह क्लिंटन, गेट्स यांची उपस्थिती

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे.
मुंबईत आजपासून क्लायमेट वीक! अंतराळवीर राकेश शर्मा, शुभांशू शुक्ला एकाच मंचावर; सचिन तेंडुलकरसह क्लिंटन, गेट्स यांची उपस्थिती
Published on

मुंबई : भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. मुंबईतील जिओ वर्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक’चे आज (दि.१७) सकाळी उद्घाटन झाले.

१७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान जिओ वर्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकचा हा महत्त्वपूर्ण भाग आहे. हवामान विषयावरील जागतिक संवादासाठी हा मंच उभारण्यात आला असून प्रोजेक्ट मुंबई ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजक असून महाराष्ट्र शासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महापालिका यांचे या कार्यक्रमास सहकार्य लाभले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांमध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, द रॉकफेलर फाऊंडेशनचे राजीव शाह, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (वर्ल्ड बँक ग्रुप) चे इमाद फखौरी, एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंडच्या अमांडा लेलँड आणि अलाइड क्लायमेट पार्टनर्सच्या क्लॅरिसा डी फ्रँको यांचा समावेश आहे.

हा कार्यक्रम “सारे जहाँ से अच्छा” शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे. अवकाशातून भारत कसा दिसतो, या प्रश्नावर राकेश शर्मा यांनी दिलेल्या ऐतिहासिक उत्तरावर आधारित ही संकल्पना आहे.

व्यापक संवाद

मुंबई क्लायमेट वीकमध्ये तळागाळातील संस्था, सामाजिक क्षेत्रातील नेते, उद्योग क्षेत्रातील शाश्वतता तज्ज्ञ आणि धोरणकर्ते एकत्र येऊन भारत व ग्लोबल साऊथसाठी हवामान उपायांवर चर्चा करणार आहेत.

कार्यक्रमात हिलरी क्लिंटन, सौम्या स्वामीनाथन, एस्थर फिनिदोरी यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींसह केंद्रीय मंत्री व विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

जागतिक सहभाग

कार्यक्रमात केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उद्योगक्षेत्रातील नोवेल टाटा, नादिर गोदरेज, रोहिणी निलकेणी उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमात अभिनेत्री दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर पर्यावरण विषयावर आपली भूमिका मांडणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in