बहीण-भाऊ अडकले प्रचंड वाहतूककोंडीत; ठाणे, भिवंडी, मुंब्र्यात वाहनांच्या रांगाच रांगा

ठाणे, भिवंडी, मुंब्र्यात वाहतूककोंडीमुळे रक्षाबंधनला जाणाऱ्या लाखो बहीण-भावांचा हिरमोड झाला. रक्षाबंधननिमित्त सकाळीच सकाळी भाऊ बहिणींकडे तर बहिणी भावांकडे निघाल्या. पण, मुंब्रा, भिवंडीतील नारपोली, कापूरबावडी, ठाणे आणि कल्याणसह अनेक प्रमुख ठिकाणी ते तासभराहून अधिक वेळ अडकून पडण्याची वेळ त्यांच्यावर वेळ आली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

एन. के. गुप्ता/ठाणे :

ठाणे, भिवंडी, मुंब्र्यात वाहतूककोंडीमुळे रक्षाबंधनला जाणाऱ्या लाखो बहीण-भावांचा हिरमोड झाला. रक्षाबंधननिमित्त सकाळीच सकाळी भाऊ बहिणींकडे तर बहिणी भावांकडे निघाल्या. पण, मुंब्रा, भिवंडीतील नारपोली, कापूरबावडी, ठाणे आणि कल्याणसह अनेक प्रमुख ठिकाणी ते तासभराहून अधिक वेळ अडकून पडण्याची वेळ त्यांच्यावर वेळ आली.

मुंब्रा टोल नाका, खारेगाव आणि भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील गायमुख-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. यापूर्वी ठाणे वाहतूक पोलिसांनी ८ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजल्यापासून ११ ऑगस्ट पहाटे ५ वाजेपर्यंत ठाणे-घोडबंदर रस्त्यावरून जड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याची अधिसूचना जारी केली होती. गायमुख घाटातील काजुपाडा ते नीरा केंद्र दरम्यान ३०० ते ४०० मीटर लांबीच्या भागाची दुरुस्ती सुरू आहे. रस्ता विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिस एकत्रितपणे परिस्थिती हाताळत आहेत. तरीही शुक्रवारी आणि शनिवारी खारेगाव टोल प्लाझापासून कौसापर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात उशीर झाला.

ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले की, सुमारे १४० पोलिस कर्मचारी तैनात केले होते. त्यात सहा वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि १८ पीएसआय/एपीआयचा समावेश होता. हे काम नेहमीच्या व्यस्ततेच्या दिवशी केले असते तर परिस्थिती भीषण झाली असती. म्हणूनच आम्ही रक्षाबंधनाच्या काळात ८ ते १ ऑगस्ट असा कालावधी ठरवला," असे त्यांनी 'नवशक्ति'ला सांगितले.

भिवंडीतील शिक्षिका डॉली गुप्ता यांनी सांगितले की, त्या आणि त्यांचे पती दुपारी १.१० वाजता मोटरसायकलने विठ्ठलवाडी (कल्याण) येथील भावाकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी निघाले होते. "विठ्ठलवाडीत पोहोचायला दुपारचे २.३० वाजले. जो प्रवास साधारण ३० ते ४० मिनिटांत पूर्ण होतो," असे त्यांनी सांगितले.

भगवान दास यांनी सांगितले की, ते पत्नी व मुलांसह भिवंडीहून ठाण्यात मेहुण्याकडे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी 'कॅब'ने निघाले होते. परंतु अंजनफाटा-कशेळी रस्त्यावर त्यांना तासाभराहून अधिक वेळ वाहतुकीत अडकून राहावे लागले. "दररोजच्या तुलनेत कॅबचे भाडे ४० ते ७० रुपयांनी जास्त घेतले," असेही त्यांनी सांगितले.

इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त करताना, सणांच्या काळात रस्त्याचे काम टाळण्याची मागणी केली. "रक्षाबंधनला कुटुंबासह प्रवास केला जातो. असे काम शनिवार-रविवार किंवा गैर-सणांच्या दिवशी करावे," असे एका प्रवाशाने सांगितले.

खड्डे आणि निकृष्ट रस्त्यांमुळे समस्या

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक नरेश मणेरा यांनी रस्त्यांची निकृष्ट अवस्था आणि दुरुस्तीच्या कामात वापरलेल्या कमी दर्जाच्या साहित्याला जबाबदार धरले. "पावसाळ्यापूर्वीच रस्ता खराब झाला होता. आता ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे फक्त एकच मार्गिका सुरू आहे. खड्डे हे वाहतूककोंडीचे मुख्य कारण आहे. या मार्गासाठी डांबराऐवजी काँक्रिटचा वापर हा कायमस्वरूपी उपाय ठरेल," असे त्यांनी सांगितले.

जेएनपीटी पोर्ट, महापे रोड आणि नवी मुंबईहून गुजरातला जाणारी जड वाहने घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाट मार्गाने जातात. हा रस्ता गुजरातला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. गायमुख रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे अधिकाऱ्यांनी वाहतूक मुंबई-नाशिक महामार्ग आणि खारेगाव, मुंब्रा टोल नाका मार्गे वळवली. मात्र, या पर्यायी मार्गावरही सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प झाली.

तासाभराचा विलंब

वाहनचालकांनी सांगितले की, साधारणपणे १० ते २० मिनिटांत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी वाहतूककोंडीमुळे एका तासाहून अधिक वेळ लागत होता. मुंब्रा-खारेगाव, ठाणे-घोडबंदर आणि भिवंडी-कल्याण मार्गावर ही परिस्थिती पाहायला मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in