राम मंदिर भाजपची जहागिरी नाही-संजय राऊत

देशात सध्या लोकशाही आहे. देश व संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.
राम मंदिर भाजपची जहागिरी नाही-संजय राऊत

मुंबई : भारतीय जनता पक्ष ही इव्हेंट मॅनेजमेंट पार्टी असून राम मंदिर भाजपची जहागिरी नाही, असा घणाघात खा. संजय राऊत यांनी सोलापूर येथे केला. याच दौऱ्यात बाळे येथे कार्यक्रम आटोपून जाताना त्यांच्या गाडीवर चप्पलफेक झाली.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज सोलापूर दौ-यावर होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना भाजप ही इव्हेंट मॅनेजमेंट पार्टी आहे. आम्ही यांना राजकीय पक्ष मानतच नाही तर ही मोदी-शाह यांची टोळी आहे, असे म्हटले. तसेच राम मंदिर ही भाजपची जहागिरी नाही, असा टोला लगावताना राजकीय पक्ष असे वर्तन कधीच करीतच नाहीत. मुळात वाजपेयी-अडवाणी यांचा पक्ष विचारधारा जोपासणारा होता. आता तसे राहिले नाही. त्यामुळे आज ही पार्टी ढोंगी वाटत आहे, असे टीकास्त्र सोडले.

सोलापूर दौऱ्यात त्यांनी रविवारी भाजपवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला देवेंद्र फडणवीस यांनी शिल्लक सेना अशी टीका केली होती. त्यावर खा. राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणत आहात. पण तुम्ही २०२४ मध्ये शिल्लक राहता की नाही हा प्रश्न आहे, असा टोला लगावला. राममंदिर पूर्ण झाले. त्यातच हिंदू-मुस्लिम वादही आता जुना झाला. त्यामुळे भाजपने मराठा-ओबीसी वादाचे कारस्थान सुरू केले आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण केल्याशिवाय भाजपला निवडणुकाच लढता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी हा नवा मुद्दा शोधला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी केला. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते.

देशात सध्या लोकशाही आहे. देश व संविधान वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. संविधानाचे रक्षण करणे हेच दोघांचे ध्येय आहे. २०२४ च्या निवडणुकीत १० वर्षांची हुकूमशाही नष्ट होईल. रावणाची दहा तोंडे नष्ट झाली, तशी मोदी-शहा यांची दहा वर्षांची सत्ता नष्ट होणार आहे, असे राऊत म्हणाले. ईव्हीएम मशिनसंबंधी बोलताना ईव्हीएम हॅक करता येते, याचा शोध भाजपनेच लावला. आज जगभरातील निवडणुकीत ईव्हीएम कालबा ठरविले आहे. आता बांगला देशानेही ईव्हीएम वापरणे बंद केले. मात्र, भारतात हे सुरू आहे. त्यामुळे मोदी-शहा यांची सत्ता असेपर्यंत भारतात लोकशाही धोक्यात आहे, असा आरोप राऊत यांनी केला.

राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक

सोलापुरात खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी तेथून परत जात असताना राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. यावेळी नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देत कार्यकर्ते तेथून पसार झाले. त्यामुळे या हल्ल्यामागे राणे समर्थक असल्याचा पोलिसांना संशय आहे.

logo
marathi.freepressjournal.in