
मुंबई : पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबई महापालिकेवर फोकस केला आहे. रिपब्लिकन पक्षाने मुंबई पालिका निवडणुकीत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायची तयारी केली आहे. या निवडणुकीत रिपाइंला २०-२५ जागा मिळाव्यात आणि जागा देण्याची जबाबदारी भाजपची आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पक्ष सन २०१२ साली युतीसोबत आल्याने युतीची महायुती झाली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान २० ते २५ जागा सोडल्या पाहिजेत. जिल्हा परिषदमध्ये किमान ५ आणि पंचायत समितीमध्ये १ जागा सोडल्या पाहिजेत. महायुतीमध्ये अनेक पक्ष आले असले तरी प्रमुख पक्ष म्हणून भाजपने महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला जागा सोडण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तसेच रिपब्लिकन पक्षाला राज्य सरकारमध्ये सत्तेत वाटा म्हणून राज्यात एक मंत्रिपद, एक एमएलसी महामंडळ सदस्य; जिल्हा नियोजन समिती आणि एसइओ पदे दिली पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची संयुक्त बैठक घेऊन जागावाटप निश्चित केले पाहिजे असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक झाली.
..तर मविआत फूट पडेल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल. मराठी मते आमच्या सोबतही आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.