दीपक केसरकर यांना ‘रामटेक’ बंगला; १८ पैकी १६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप

दीपक केसरकर यांना ‘रामटेक’ बंगला; १८ पैकी १६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप

विखे-पाटील यांचे परंपरागत विरोधक असलेल्‍या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आधी हा बंगला होता.

शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना अखेर बंगल्‍यांचे वाटप झाले आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी १८ पैकी १६ मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या दृष्‍टीने न फळणारा ‘रामटेक’ बंगला हा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मिळाला आहे. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पेडर रोडवरील ‘रॉयल स्टोन’ बंगला वितरित करण्यात आला आहे. विशेष म्‍हणजे, नगर जिल्‍ह्यातील विखे-पाटील यांचे परंपरागत विरोधक असलेल्‍या माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आधी हा बंगला होता.

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार ९ ऑगस्टला पार पडला. यात शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर १४ ऑगस्टला मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. आता मंगळवारी सरकारी बंगला आणि मंत्रालयातील दालनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले.

शिवसेना भाजप आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हणजे १९९५ आणि १९९९मध्ये ‘रामटेक’ हा बंगला तत्कालीन उपमुख्यमंत्री अनुक्रमे गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ यांनी आपल्याकडे ठेवला होता; मात्र त्यानंतर तेलगी घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर भुजबळ मंत्रिपदावरून पायउतार झाले, तरी २००२-०३ नंतर मंत्री नसताना भुजबळ यांचा मुक्काम ‘रामटेक’वर होता. २००४ ते २०१४ अशी सलग १० वर्षे भुजबळ ‘रामटेक’वर होते; मात्र २०१४ नंतर ‘रामटेक’ मुक्कामी जाणाऱ्या मंत्र्यांचे राजकीय ग्रह फिरू लागले.

२०१४मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महसूलमंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांना ‘रामटेक’ बंगला मिळाला होता; मात्र जमीन घोटाळ्याच्या आरोपात त्यांना मंत्रिपद सोडावे लागले. पुढे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याच बंगल्यात शेवटचा श्वास घेतला. तेव्हापासून ‘रामटेक’ बंगल्याबद्दल मंत्र्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. २०१९मध्ये ठाकरे सरकारमध्ये छगन भुजबळ पुन्हा ‘रामटेक’वर मुक्कामी होते. आता हा बंगला दीपक केसरकर यांना मिळाला आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना ‘पर्णकुटी’ हा बंगला मिळाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांना मंत्रालयासमोरील ‘रत्नसिंधू’ या बंगल्यातून मुक्काम हलवावा लागला आहे. त्यांना मलबार हिलवरील ‘मुक्तगिरी’ बंगला मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in