बावनकुळेंना ‘रामटेक’, नार्वेकरांना ‘शिवगिरी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दालन, बंगले वाटप

महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खातेवाटपही झाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री व राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालन मिळाले. त्यानंतर आता मंत्र्यांनाही शासकीय बंगल्याचे वाटपही सोमवारी करण्यात आले आहे.
बावनकुळेंना ‘रामटेक’, नार्वेकरांना ‘शिवगिरी’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना दालन, बंगले वाटप
Published on

मुंबई : महायुतीच्या सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि आता खातेवाटपही झाले. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री व राज्यमंत्र्यांना मंत्रालयात दालन मिळाले. त्यानंतर आता मंत्र्यांनाही शासकीय बंगल्याचे वाटपही सोमवारी करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘रामटेक’, राधाकृष्ण विखे-पाटील यांना ‘रॉयलस्टोन’ तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘शिवगिरी’ बंगला मिळाला आहे.

मंत्र्यांना मंत्रालयातील दालन तसेच सरकारी बंगल्यांचेही वाटप करण्यात आले. ३१ मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप झाले. त्यामध्ये, विधानपरिषद सभापती राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला देण्यात आला असून पंकजा मुंडेंना ‘पर्णकुटी’, शंभूराज देसाईंना ‘मेघदूत’, गणेश नाईकांना ‘पावनगड’, धनंजय मुंडेंना ‘सातपुडा’, चंद्रकांत पाटील यांना ‘सिंहगड’ हा बंगला देण्यात आला.

राधाकृष्ण विखे-पाटील ‘रॉयलस्टोन’, हसन मुश्रीफ (क-८) विशाळगड, चंद्रकांतदादा पाटील आता ब-१ सिंहगड बंगल्यात राहतील. गिरीश महाजन हे सेवासदन, गुलाबराव पाटील ‘जेतवन’, दादा भुसे ‘ब-३ जंजिरा’, संजय राठोड हे शिवनेरी बंगल्यात असतील. मंगलप्रभात लोढा यांना ‘ब-५ विजयदुर्ग’, उदय सामंत यांना ‘मुक्तागिरी’, नव्यानेच मंत्रिपद मिळालेल्या जयकुमार रावल यांना चित्रकुट बंगला देण्यात आला आहे.

अतुल सावे ‘अ-३ शिवगढ’, अशोक उईके ‘अ-९ लोहगड’, आशिष शेलार ‘ब-२ रत्नसिषु’, दत्तात्रय भरणे ‘ब-६ सिद्धगड’, अदिती तटकरे ‘अ-५ प्रतापगड’, शिवेंद्रराजे भोसले ‘३-७ पन्हाळगड’, माणिकराव कोकाटे ‘अंबर-२७’, जयकुमार गोरे ‘क-६ प्रचितीगड’, नरहरी झिरवाळ ‘सुरूचि ९’ बंगल्यात राहतील. संजय सावकारे यांना ‘अंबर-३२’, संजय शिरसाठ यांना ‘अंबर-३८’, प्रताप सरनाईक यांना ‘अर्वतो-५’, भरत गोगावले यांना ‘सुरूची २’, मकरंद पाटील यांना ‘सुरूची-३’ या बंगल्यांचे वाटप झाले आहे.

भाजप मंत्र्यांना झुकते माप; शिवसेनेची नाराजी

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीतील नाराजीनाट्य संपलेले नाही. बंगले वाटपात भाजप मंत्र्यांना झुकते माप देत, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांना फ्लॅट दिल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, प्रताप सरनाईक या कॅबिनेट मंत्र्यांना फ्लॅटच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. तसेच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्र्यांना बंगले मिळाल्यामुळे शिवसेना नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in