'...हे खपवून घेतले जाणार नाही'; राणा दाम्पत्य पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी केली कानउघडणी

सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप न घेतल्याने ती मान्य करत सुनावणी १९ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.
'...हे खपवून घेतले जाणार नाही'; राणा दाम्पत्य पुन्हा गैरहजर राहिल्याने न्यायाधीशांनी केली कानउघडणी

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या राणा दाम्पत्याचा गैरहजेर राहण्याचा सिलसिला आजही सुरूच राहिला. न्यायालयाच्या आदेशानंतरही गुरुवारी ते सुनावणीला गैरहजर राहिल्याने मुंबई सत्र न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा यांच्या वकिलांची चांगलीच कानउघडणी केली. गैरहजर राहण्यासाठी पळवाट काढता, हे खपवून घेतले जाणार नाही. पुढील सुनावणीला गैरहजर राहिल्यास नॉनबेलेबल वॉरंट जारी केला जाईल, असे स्पष्ट करत सुनावणी १९ जानेवारीला निश्‍चित केली.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राणा दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याचा दोषमुक्ततेचा अर्ज न्यायालयाने फेटाळताना आरोप निश्‍चितीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी राणा दाम्पत्याच्या वतीने अ‍ॅड. रिझवान मर्चंट यांनी राणा दाम्पत्य अनेक बैठकांमध्ये व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकत नाहीत. त्यांना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मात्र सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप न घेतल्याने ती मान्य करत सुनावणी १९ जानेवारीपर्यंत तहकूब ठेवली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in