

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात आता पर्यटकांना फेरफटका मारणे आरामदायी झाले आहे. प्राणिसंग्रहालय परिसरात फेरफटका मारण्यासाठी बॅटरीवर धावणाऱ्या ९ आसनी चार ‘ई-बग्गी’ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच लहान मुलांसाठी १५ आसनी डबल डेकर बसचेही लोकार्पण करण्यात आले. दिव्यांगांसाठी ही बससेवा मोफत असून, इतर पर्यटकांना माफक दरात ही बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बांबूपासून बनवलेले बॅरिकेड्सचा वापर
राणी बागेत मोठ्या प्रमाणात पर्यटक, अभ्यासक येतात. त्यामुळे अनेकदा गर्दी होते. अशावेळी बॅरिकेडची गरज भासते. यासाठी लोखंडी बॅरिकेडसचा वापर न करता पर्यावरणपूरक बांबूंपासून बॅरिकेड्स तयार करण्यात आले आहेत. या पर्यावरणपूरक बॅरिकेडचेही मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांमुळे प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांचा अनुभव अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रमांना प्रोत्साहन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने बृहन्मुंबई महापालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे बॅटरीवर धावणाऱ्या पर्यावरणपूरक ‘ई-बग्गी’चे लोकार्पण करण्यात आले. तसेच, भायखळ्यातील महापौर निवासस्थानी सफेद चाफ्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने ही ‘ई-बग्गी’ पर्यावरणपूरक वाहन सेवा सुरू करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुले तसेच चालण्यास अडचण असलेल्या पर्यटकांना या सुविधेचा मोठा लाभ होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेचे उपायुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, संचालक (प्राणिसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.