दिवाळी सुट्टी, त्यात राणीच्या बागेतील वाघाची डरकाळी, पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी बच्चेकंपनीसह मोठ्यांनी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाला भेट दिली. त्यामुळे दिवाळी सणात राणीची बाग पर्यटकांनी फुलली. दरम्यान, शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत ४९ हजार ३२१ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिल्यानेच प्राणी संग्रहालयाच्या तिजोरीत १९ लाख ३१ हजार ८८५ रुपये महसूल जमा झाला आहे.
देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. त्यात दिवाळी सणात सलग सुट्ट्या आल्याने यंदाच्या दिवाळीत मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचला. सलग सुट्टी आल्याने बच्चेकंपनीचे आकर्षण ठरते राणीची बाग. दिवाळीत सुट्ट्या आल्याने लहान मुलांसह मोठ्यांनी राणीच्या बागेला भेट देणे पसंत केले. शुक्रवार ते सोमवार या चार दिवसांत ५० हजार पर्यटकांनी भेट दिली असून, १९ लाखांहून अधिक महसूल जमा झाल्याचे प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
उद्यान-प्राणी संग्रहालयाचे आकर्षण
पालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २८३ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत, तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत.
शिवा-शिवानी अस्वलाच्या जोडीचा आनंद!
पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेल्या राणीच्या बागेत दररोज १५ ते १६ हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवार पर्यटकांची संख्या २५ हजारांच्या घरात पोहोचते. याचे मुख्य कारण म्हणजे राणीच्या बागेतील पेंग्विन करिश्मा, शक्ती व हरणे यांची धमाल मस्ती. त्यात आता शिवा व शिवानी अस्वलाच्या जोडीचा आनंद घेता येत आहे.