रणजित सावरकरांनी 'या' कारणासाठी घेतली राज ठाकरेंची भेट

जवाहरलाल नेहरूंनी एका महिलेसाठी देशाची फाळणी केली’ या रणजित सावरकरांच्या विधानामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता
रणजित सावरकरांनी 'या' कारणासाठी घेतली राज ठाकरेंची भेट

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. एकीकडे भाजपने राहुल गांधींवर निशाणा साधला असतानाच दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘जवाहरलाल नेहरूंनी एका महिलेसाठी देशाची फाळणी केली’ या रणजित सावरकरांच्या विधानामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर यांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाले रणजित सावरकर?

याआधी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यसैनिक सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली. ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी भाजपकडून राहुल गांधींवर निशाणा साधला जात आहे. या सर्व वादावर बोलताना रणजित सावरकर यांनी थेट जवाहरलाल नेहरूंबद्दल गंभीर दावा केला आहे.

“पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका स्त्रीसाठी भारताची फाळणी स्वीकारली होती. भारताची सर्व गुप्त माहिती 12 वर्षे इंग्रजांना देण्यात आली होती. ज्या नेत्याला आपण चाचा नेहरू म्हणतो त्यांनी देशाची कशी फसवणूक केली', असा दावा रणजित सावरकर यांनी केला. 

दरम्यान राज ठाकरे यांच्या मनसेने शेगावला थेट रस्त्यावर उतरून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला, यामुळेच रणजित सावरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे समजते. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in