मुंबई : अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू तसेच अटकेची कारवाई करू, म्हणून एका ४० वर्षीय व्यक्तीकडून सतत खंडणीची मागणी केली जात होती. या ब्लॅकमेलच्या प्रकाराला कंटाळून या व्यक्तीने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर सांताक्रुझ पोलिसांनी राजस्थानातून दोन आरोपींना अटक केली. तौहिद जाफर अली आणि वारीस जाफर अली अशी दोघांची नावे असून याच गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
बदलापूर येथे राहणाऱ्या या व्यक्तीला ७ ते ९ ऑगस्ट या कालावधीत एका तरुणीने व्हिडीओ कॉल करून स्वत: नग्न होऊन त्यांनाही नग्न होण्यास प्रवृत्त केले होते. तसेच त्यांचे अश्लील व्हिडीओ काढून त्यांनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकीच त्यांनी दिली होती. त्यामुळे त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्यांना ५६ हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर त्यांना दिल्ली सायबर सेलचे पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून पुन्हा धमकाविले जात होते. त्यांच्यावर अटकेची कारवाईची धमकी देऊन आणखीन पैशांची मागणी केली जात होती. या ब्लॅकमेलला कंटाळून या व्यक्तीने ९ ऑगस्टला सांताक्रुझ येथे गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार नंतर त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने सांताक्रुझ पोलिसांत संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांना तांत्रिक माहितीवरून संबंधित आरोपी राजस्थानातील असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने राजस्थानातील डिंग जिल्हा, लेवडा गावातील रहिवाशी असलेल्या तौहिद अली आणि वारीस अली या दोन बंधूंसह एका १६ वर्षांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांचा ताबा लवकरच संबंधित पोलिसांना देण्यात येणार आहे.