मुंबई : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयाच्या उपप्राचार्याविरोधात त्यांच्या सहकारी महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडेही या महिलेने लेखी तक्रार नोंदवली आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी या उपप्राचार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही महिला महाविद्यालयात अधीक्षिका म्हणून काम करते. आरोपीने मला कार्यालयात वाईट हेतूने हात लावला. तसेच माझ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ऑगस्ट २०२१ पासून मी आणि उपप्राचार्य हे एकाच कार्यालयात काम करतो. सुरुवातीच्या दिवसाला काही अडचण नव्हती. मात्र काही दिवसांपासून उपप्राचार्यांची वागणूक बदलली. ते माझ्या जवळ येऊन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागले, असा आरोप पीडितेने केला.
उपप्राचार्यांनी महिलेला फोन केला आणि तिचे कौतुक करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. मला तुझ्या वाढदिवसाची पार्टी द्यायची आहे. तु माझ्याबरोबर हॉटेलमध्ये येशील का? अशी विचारणा त्याने तिला केली, असे पीडितेने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी माझ्याशी कायमच जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. सुट्टीच्या दिवशीही तो मला फोन करत होता. माझ्या साडीवरून कमेंट करत होता. तू साडीमध्ये सुंदर दिसतेस. लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ खूप सुंदर दिसतात. कॉलेजच्या कार्यक्रमात हा आरोपी उपप्राचार्य मुद्दामून पीडितेच्या बाजूला बसत होता. तसेच तिला तो आक्षेपार्ह स्पर्श करत होता. याबाबत या पीडितेने महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रारही केली होती. त्यामुळे आरोपी संतापला. हे प्रकरण अधिक वाढू लागल्यावर पीडितेने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर उपप्राचार्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
आम्ही उपप्राचार्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ४१ (अ) नुसार नोटीस बजावली आहे.