
मुंबई : १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पोक्सो न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी दोषी ठरविताना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. भारतीय मुलगी बलात्काराचा खोटा आरोप कुणाविरुद्ध करू शकत नाही. तिने केलेला आरोप खोटा ठरला, तर पुढे आयुष्यभर लोक आपल्याकडे तुच्छतेने पाहतील. विशेषतः अविवाहित मुलींना लग्नासाठी मुलगा शोधणे कठीण बनेल, याची तिला जाणीव असते, असे निरीक्षणही न्यायालयाने निकाल देताना नोंदवले. १० मे २०२१ रोजी मध्यरात्री पीडित मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते.
या घटनेच्या खटल्यात विशेष पोक्सो न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी निकाल दिला. विशेष सरकारी वकील गीता मालणकर यांनी पीडित मुलीसह इतर साक्षीदार तपासले तसेच वस्तुस्थितीदर्शक पुरावे सादर केले. त्याची दखल घेतानाच न्यायालयाने पीडित मुलीचा जबाब विश्वासार्ह मानून त्याआधारे आरोपी तरुणाला दोषी ठरवले. याचवेळी आरोपीला १० वर्षांच्या सश्रम कारावासासह १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रक्कमेपैकी १० हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.