लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक

पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता.
लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाला अटक

मुंबई : विलेपार्ले-अंधेरी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या २६ वर्षांच्या बिहारी तरुणाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. भरत बहादूर पंडित असे या आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहारच्या मधुबनीचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही घटना बुधवारी सकाळी पावणेअकरा वाजता अंधेरी-विलेपार्ले रेल्वे स्थानकादरम्यान चालत्या लोकलमध्ये घडल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव महाजन यांनी सांगितले. १९ वर्षांची तक्रारदार तरुणी ही बुधवारी विलेपार्ले रेल्वे स्थानकातून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होती. यावेळी तिच्या मागे उभा असलेल्या एका तरुणाने तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. गर्दीमुळे धक्का लागल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते; मात्र अंधेरी रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर त्याने पुन्हा तिच्या मागून अश्‍लील चाळे करून तिचा विनयभंग केला. यावेळी तिथे गस्तीवर असलेल्या निर्भया पथकाच्या अंमलदार मिनाक्षी कळंबे, मिनाक्षी सरवदे, सविता सातव, नविता तांडेल यांना तिने हा प्रकार सांगितला. या घटनेचे गांभीर्य लक्षात येताच या महिला पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या भरत पंडितला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला होता.

logo
marathi.freepressjournal.in