रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती; पहिल्या महिला डीजीपी बनल्या

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस आयुक्तांकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती; पहिल्या महिला डीजीपी बनल्या
Published on

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी अखेर केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृहविभागाने गुरुवारी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. त्या लवकरच अतिरिक्त कार्यभार असलेल्या मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ शुक्रवारी २९ डिसेंबरला पोलीस सेवेतून निवृत्त झाले. नायगाव येथील पोलीस परेड मैदानात आयोजित एका कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला होता. मात्र, निवृत्तीनंतरही त्यांच्या जागी गृहविभागाने नवीन पोलीस महासंचालकांची नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा पोलीस आयुक्तांकडे राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. अखेर गुरुवारी ४ जानेवारीला गृहविभागाने एक पत्रक जारी करण्यात आले. त्यात रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले. त्या लवकरच आपल्या पदाचा कार्यभार हाती घेणार आहेत.

१९८८ तुकडीच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला

पुढील वर्षी जूनमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. रजनीश शेठ यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला, विवेक फणसाळकर, संदीप बिष्णोई यांचे नाव चर्चेत होते. रश्मी शुक्ला या फोन टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली होती. याच गुन्ह्यात त्यांची पोलिसांकडून चौकशी झाली होती. मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले दोन्ही गुन्हे रद्द करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा पोलीस महासंचालकाचा मार्ग सोपा झाला होता. त्यात त्यांचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असल्याने त्यांना पुन्हा राज्यात बोलाविण्यात आले होते. त्यासाठी केंद्राकडे गृहविभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर गुरुवारी त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in