
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या वादावरून अटकेत असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम आणखी वाढला आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राखून ठेवलेला निर्णय ४ मे रोजी देणार असल्याचे सोमवारी स्पष्ट केले.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी पुकारले होते. कायदा आणि सुव्यवस्था न बिघडवण्याच्या कारणांती मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम १५३(अ), ३४, ३७ सह मुंबई पोलीस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आयपीसी कलम १२४ (अ)अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही दाखल केला. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून, शनिवारी न्या. राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवत तो सोमवारी सकाळी देण्याचे निश्चित केले होते; परंतु सोमवारी सकाळपासून न्यायालयीन कामकाज आणि दुपारी अजून एक महत्त्वाची केस आल्याने वेळ न मिळाल्याने न्यायालयाने तो ४ मे रोजी दिला जाईल, असे स्पष्ट केले आहे. बुधवारी या प्रकरणी कोणताही युक्तिवाद न होता थेट निकाल सुनावला जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.