रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

या बालनाट्य स्पर्धेला एलआयसी, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी आर्थिक भार उचलून सहाय्य केले आहे.
रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!
PM
Published on

मुंबई: जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या 'को म की का' या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लॅनेट, काळाचौकी शाळेच्या 'जा रे जा, सारे जा' पटकाविले. तसेच पहिले उत्तेजनार्थचे बक्षीस विलेपार्ले महिला संघ - मराठी माध्यम शाळेच्या 'छोटा अंबानी' या बालनाट्याला तर दुसरे उत्तेजनार्थ गुरुकुल द डे स्कूलच्या 'अ-फेअर'ला देण्यात आले. या चुरशीच्या स्पर्धेत १७ बालनाट्यांचा समावेश होता, त्यातून हा अंतिम निकाल देण्यात आला आहे.

लालबाग, परळ या कामगार विभागातील डिलाईल रोड 'रविकिरण मंडळ हे 'दक्षिण मुंबईचं सांस्कृतिक केंद्र' म्हणून ओळखले जाते. ते खेळाडू आणि कलावंतांचे आशेचे किरण असून गेली सहा दशके हे मंडळ अविरत कार्यरत आहे. लहान मुलांची शालेय जीवनापासून नाट्यकलेची आवड जोपासली जावी व त्यासोबतच त्यांची प्रशंसा व्हावी या उद्देशाने गेली ३६ वर्षे ही संस्था बालनाट्य स्पर्धांचे आयोजन करीत आहे. नुकतीच मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिर येथे दिवंगत जेष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना समर्पित करण्यात आलेली ३७ वी बालनाट्य स्पर्धा मुलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी खास 'आई कुठे काय करते?' या मालिकेतील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी, अभिनेता अभिषेक देशमुख, या मालिकेची लेखिका व कमलाकर नाडकर्णी यांची कन्या नमिता नाडकर्णी - वर्तक, केईएमच्या डॉ. नीना सावंत(मानोसोपचार तज्ज्ञ), यांसह परीक्षक अभिनेत्री दीप्ती भागवत, जुई लागू - खोपकर व अरुण मडकईकर उपस्थित होते.

या बालनाट्य स्पर्धेला एलआयसी, ओएनजीसी, इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम यांनी आर्थिक भार उचलून सहाय्य केले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अशोक परब यांनी सांभाळली व पारितोषिक वितरण समारंभाला लागणाऱ्या क्रिएटिव्ह कामाची जबाबदारी विनीत देसाई, मंदार साटम, व रोशन वांद्रे यांनी सांभाळली.

logo
marathi.freepressjournal.in