मुंबई : पुण्यातील महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सदर समितीचा कालावधी तीन वर्षांचा असून, या समितीच्या अध्यक्षपदी पुण्यातील शाहीर हेमंत मावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील लोकसाहित्याचे संशोधन करणे, या संदर्भात सल्ला देणे व असे लोकसाहित्य प्रकाशित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसाहित्य समितीची स्थापना करण्यात आली होती. तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी समितीला ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सदर समितीचा कालावधी आल्यानंतर या समितीचे पुर्नगठन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यानुसार, राज्य लोकसाहित्य समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पुण्यातील शाहीर हेमंत मावळे असून, सदस्यपदी ठाणे येथील मोनिका ठक्कर, गणेश चंदनशिवे, प्रकाश खांडगे, संभाजीनगर येथील शेखर निरंजन भाकरे, नांदेड येथील मार्तंड कुलकर्णी, पुणे येथील प्रणव पाटील, डॉ. संगीता बर्वे, भावार्थ रामचंद्र देखणे यांचा समावेश करण्यात आला आहे.