
मुंबर्इ : देशात डिजिटल पेमेंट करण्याच्या ऑनलार्इन ‘यूपीआय’ व्यवस्था तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारांची संख्या यंदा ऑगस्ट महिन्याच्या ३० तारखेपर्यंत प्रथमच १०२४ कोटींपर्यंत पोहोचली आहे. या व्यवहारांतून एकूण १५.२ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार यंदा जुलै महिन्यात देशभरात यूपीआयच्या माध्यमातून एकूण ९३४ कोटी आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार झाले आणि त्यातून एकूण १५.३ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली. ऑगस्ट महिन्यात मात्र रुपयांची देवणाघेवाण कमी असली तरी यूपीआय व्यवहारांची संख्या विक्रमी झाली आहे. ३१ ऑगस्टपर्यंतचे सर्व व्यवहार विचारात घेतल्यास यूपीआय देवाणघेवाणीचे प्रमाण १६ लाख कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ऑनलार्इन पेमेंट करणाऱ्या कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधन सणानिमित्त विक्रीत वाढ झाली. रक्षाबंधनाच्या दिवशी तर यूपीआयच्या माध्यमातून ‘गिफ्ट’ देण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.