आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती
आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती; गिरीश महाजन यांची घोषणा

आरोग्य विभागात १०,१२७ पदांची भरती करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारीदरम्यान याबाबतची जाहिरात निघेल, तसेच २५ ते २६ मार्चदरम्यान भरती परीक्षा होईल, २७ एप्रिलपर्यंत उमेदवारांची निवड केली जाईल, अशी माहिती महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यावेळी साडेअकरा लाख उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते,

कोविडमध्ये दोन ते अडीच वर्षांत कंत्राटी कामगार म्हणून वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना आरोग्य विभागाच्या भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांचे गुणांकन करण्याची कार्यपद्धती मुख्य सचिवांनी ठरवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. वैद्यकीय सहाय्यक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी या कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे.परंतु कोरोना काळामुळे, आरक्षणाच्या अडचणीमुळे तसेच महापोर्टल रद्द होण्याने दरम्यानच्या काळातील भरती होऊ शकली नाही. आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारने आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून भरतीचा प्रश्न प्रलंबित होता. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा निर्माण झाली होती. सुमारे साडेअकरा लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्यांनी परीक्षा शुल्कही भरले होते, परंतु विविध कारणांनी परीक्षा झाली नाही. मात्र, आता नवे सरकार युवकांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यानुसार पुढच्या २ महिन्यांत आरोग्य विभागाच्या संबंधित १० हजार १२७ जागांची भरती होईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in