मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास

अद्ययावत सोयीसुविधा ५०० बेड्सची सुविधा
मुलुंडच्या कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास

मुंबई : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंड पश्चिमेकडील कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. ५०० बेड्स अद्ययावत सोयीसुविधांसह पुनर्विकास होणाऱ्या या रुग्णालयांत वैद्यकीय व नर्सिग महाविद्यालय उभे राहणार आहे.

राज्य कामगार विमा योजना महामंडळाची (एसीक) मुंबईत विविध भागात कामगार रुग्णालये आहेत. यापैकी मुलुंड पश्चिम परिसरात २१ एकरवर १८० खाटांचे रुग्णालय असून, ते मोडकळीस आले आहे. या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्याची मागणी भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केली होती. याबाबत केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वांद्रे येथील ओएनजीसी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्र आणि राज्याच्या कामगार विभागाचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत या रुग्णालयाच्या उभारणीला मंत्री यादव यांनी मान्यता दिली आहे.

हे रुग्णालय केंद्र सरकार उभारणार असून, जमीन हस्तांतरणाबाबतचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून या रुग्णालयासंबंधी राज्य आणि केंद्रात आपला पाठपुरावा सुरू होता. रुग्णालयासोबत येथे वैद्यकीय व नर्सिग महाविद्यालय बांधण्याची मागणी आपण केली होती. त्यास देखील या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार मनोज कोटक यांनी दिली आहे. प्रस्तावित रुग्णालयाचा आराखडा बनवून येत्या काही महिन्यांत प्रशासकीय प्रक्रिया सुरू होईल, असे कोटक म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in