
मुंबई : रेल्वे मार्गावरील अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यात रेल्वे हद्दीतील लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद करण्यात आले आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रोड ओव्हर पूल, भूमिगत पूल बांधण्यात आल्याने रेल्वे अपघात रोखण्यात यश आले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी सुरक्षित आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दररोज ५० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. तिकीटासाठी रांगेत तासन् तास उभे राहाण्यापासून दिलासा मिळाला यासाठी ऑनलाईन तिकीट प्रणाली विकसित केली. युटीएस अँप आणला. प्रवाशांच्या सेवेत वातानुकूलित लोकल आणल्या. एकूणच प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये मध्य रेल्वेने अनेक महत्त्वाची सुरक्षेची कामे केली ज्यामुळे ट्रेनचे कामकाज व प्रवाशांच्या प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे.
यामुळे मध्य रेल्वे व प्रवासी सुरक्षित!
-मध्य रेल्वेवर रोड ओव्हर ब्रिज किंवा रोड अंडर ब्रिज बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट्स हळूहळू बंद केले जात आहेत. लेव्हल क्रॉसिंग गेट्स बंद केल्याने अधिक चांगली वक्तशीरता राखण्यात मदत होते आणि संरक्षितता वाढते.
-ऑक्टोबर-२०२३ मध्ये मध्य रेल्वेवर ४ लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पुणे विभागातील ३ आणि भुसावळ विभागातील १बंद करण्यात आले आहेत.
- ऑक्टोबर-२०२३ पर्यंत विभागीय स्तरावर मध्य रेल्वेवर एकूण २४ लेवल क्रॉसिंग (एलसी) फाटक बंद करण्यात आले असून त्यात मुंबईतील ५, भुसावळमधील ७, नागपूरमधील ६ आणि पुणे विभागातील ६ यांचा समावेश आहे.
डब्यात धूर शोधणारी मशीन कार्यान्वित!
डब्यांमध्ये धूर शोधणे आणि रोखण्याच्या उपकरणांची तरतूद केली, आग रोखण्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून डब्यांमध्ये धूर शोधणे आणि त्यास रोखण्याची यंत्रणा पुरवण्यात आली आहे. ऑक्टोबर-२०२३ मध्ये पॅन्ट्री कारमधील १ आणि २ पॉवर कार कोचमध्ये ३ स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टम बसवण्यात आली आहेत. ऑक्टोबर-२०२३ पर्यंत पॅन्ट्री कारमधील २ आणि पॉवर कार कोचमध्ये ९ अशा एकूण ११ स्मोक डिटेक्शन आणि सप्रेशन सिस्टिम बसवण्यात आल्या आहेत.
रेल्वे सुरक्षा ऑडिट!
आंतर-रेल्वे संरक्षा ऑडिट सर्व झोनमध्ये नियमितपणे केले जाते. उत्तम संरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी किंवा पूर्वग्रह दूर करण्यासाठी निष्पक्ष ऑडिट करण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये रेल्वे बोर्डाने नामनिर्देशित केलेल्या झोनच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांची एक टीम असते जी बोर्डाच्या सूचनेनुसार इतर झोनला भेट देतात आणि तृतीय पक्ष सेफ्टी ऑडिट करतील. मध्य रेल्वेच्या ९ स्थानकांवर विभागीय संरक्षा ऑडिट व्यतिरिक्त रेल्वे बोर्डाच्या सेफ्टी ड्राईव्ह, मुख्यालयाच्या ॲम्बुश चेक आणि विभागीय संरक्षा मोहीमा देखील घेण्यात आल्या.