मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील नोकरभरतीसाठी पालिककेडून घालण्यात आलेल्या जाचक अटींच्या विरोधात जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे. दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास होण्याची अट अन्यायकारक असून ती वगळण्यात यावी, अशी सूचना फडणवीस यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.
मुंबई महापालिकेत २ हजार रिक्त पदे भरण्यासाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. महापालिकेत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नातच उत्तीर्ण झाले असले पाहिजे, अशी अट घातली आहे. उमेदवारांसाठीच्या पात्रता यादीतील अटी उमेदवारांना जाचक वाटत असून त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात नेमकी हच बाब निदर्शनास आणून दिली आहे.
फडणवीसांनी पत्रात म्हटले आहे की, अनेक बुद्धिमान व अभ्यासात हुशार असलेली मुले ही कौटुंबिक कारणांमुळे किंवा परिस्थितीमुळे दहावी किंवा पदवीच्या परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होतातच असे नाही. तेव्हा या अटी अन्याय करणाऱ्या आहेत, असे उमेदवारांना वाटते. त्यामुळे नोकरभरती प्रक्रियेतून अशा अटी वगळल्या पाहिजेत.