थॅलेसिमिया, हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना दिलासा; रक्त उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर मिळणार

थॅलेसिमिया, हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांना आता रक्त व रक्त पेढ्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
थॅलेसिमिया, हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना दिलासा; रक्त उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर मिळणार
Published on

मुंबई : थॅलेसिमिया, हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांना आता रक्त व रक्त पेढ्याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. केंद्र सरकारने ई-रक्त कोष पोर्टल विकसित केले असून सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. मोबाईलवर ई रक्त कोष पोर्टल अपलोड केल्यानंतर मोबाईलवर सगळी अपडेट रुग्णांना मिळणार असून गरजू रुग्णांची रक्तासाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे. www.eraktkosh. mohfw.gov.in या पोर्टलवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम प्राधान्याने सुरू करण्यात आला आहे. या सेवेचा गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, ट्रस्ट, कार्पोरेशन, प्रायव्हेट अशा एकूण ३९५ रक्त पेढ्यांचे, रक्त केंद्रांचे खूप मोठे जाळे असून रुग्णाला वेळेत रक्त मिळण्यासाठी आता आपल्या मोबाईलवर ई - रक्तकोष पोर्टल मार्फत सद्यस्थितीत असलेला रक्ताच्या साठ्याची माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. वारंवार रक्ताची गरज असणारे रुग्ण उदाहरणार्थ, थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, कॅन्सर इत्यादी रुग्णांना तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे.

महाविद्यालये, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष, धार्मिक संस्था, गणेश मंडळे, कार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत रक्त संकलन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. सुदृढ रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकतो. राज्यामध्ये शंभर पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची मोठी संख्या आहे. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, महान दान’ या संकल्पनेतून मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित होत असतात.

रक्त संकलनात महाराष्ट्र पहिला

महाराष्ट्र रक्त संकलनात देशात प्रथम क्रमांकावर आहे. मागील वर्षी अंदाजे २१ लाख रक्तदात्यांनी राज्यात रक्तदान केले आहे. या रक्त संकलनातून मोठ्या प्रमाणात रक्त घटक तयार करण्यात आले, ज्यामध्ये पॅक्ड रेड ब्लड सेल, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट, फ्रेश फ्रोजन प्लाज्मा याचा समावेश असून सदर रक्त घटक आवश्यकतेनुसार रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. राज्य रक्त संकलन परिषदेने हे रक्त व रक्त घटकाच्या प्रोसेसिंग चार्जेसचे दर निश्चिती केलेली आहे. या दर निश्चितीच्या मर्यादेतच रक्त केंद्रांना रुग्णासाठी रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे.

logo
marathi.freepressjournal.in