मुंबई : ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी फसवणुकीची तक्रार १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर केल्याने एकाच दिवसांत मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांना ७९ लाख ३७ हजार रुपये वाचविण्यात यश आले आहे. ही रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविण्यात आल्याने तक्रारदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच ही रक्कम संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात ट्रॉन्स्फर केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईसह देशभरात ऑनलाईन फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेता मुंबई पोलिसांनी १९३० क्रमाकांची एक हेल्पलाईन सेवा सुरू केली होती.
या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तातडीने कारवाई करून फसवणूक झालेली रक्कम गोठविण्यासाठी हालचाली केल्या जातात. मंगळवारी २८ नोव्हेंबरला एकाच दिवशी अज्ञात सायबर ठगांनी काही तक्रारदारांना संपर्क साधून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच या तक्रारदारांनी १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांकडे मदत मागितली होती.