द्राक्ष, दूध उत्पादकांना दिलासा; दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान

राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला
द्राक्ष, दूध उत्पादकांना दिलासा; दुधासाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान
PM

मुंबई : दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येईल. हे दोन्ही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत ही अनुदान योजना राबविण्यात येईल. सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट/८.३ एसएनएफ या प्रतीकरिता किमान २९ रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करावा लागेल. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्धारे देण्यात येईल. नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज ४३.६९ लाख लिटर दूध संकलित करण्यात येते. ५ रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे २ महिन्यांसाठी १३५ कोटी ४४ लाख इतके अनुदान आवश्यक असेल. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना पाच वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविडच्या काळात २०२०-२१ मध्ये ही योजना बंद करण्यात आली होती.

या योजनेत २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात उद्योजकांनी व्हॅटचा भरणा केला आहे. २०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी शिल्लक असून योजना बंद होण्यापूर्वी निश्चित केलेल्या १६ टक्केप्रमाणे व्हॅटचा परतावा देखील देण्यात येईल. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीसाठी प्रोत्साहन देणे, सुका मेवा बनविणे तसेच पर्यायी उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी या वाईन उद्योगास प्रोत्साहन देणारी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना राज्यात वाईन उद्योग विकसित करण्यासाठी देखील उपयुक्त ठरणार असल्यामुळे या योजनेस ५ वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in