साथीच्या आजारांचा मुंबईला दिलासा

साडेतीन लाख घरांची झाडाझडती; २९ हजारांहून अधिक रक्ताचे नमुने घेतले
साथीच्या आजारांचा मुंबईला दिलासा

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा गेली चार महिने झपाट्याने फैलाव होत होता. परंतु मुंबईतून वरुणराजा परताच साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. १ ते ८ ऑक्टोबर मलेरिया - २११, डेंग्यू - २५०, लेप्टो - ११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आढळलेले रुग्णांची संख्या मुंबईला काहीसा दिलासा देणारी आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत साडेतीन लाख घरांची झाडाझडती घेतली असून १ लाख ७५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात २९ हजार ८२३ लोकांचे ब्लड सॅपल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा गेल्या चार महिन्यांत मुंबईला विळखा बसला होता; मात्र ऑक्टोबर महिन्यात साथीच्या आजारांच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. तरीही अंगावर ताप काढू नये डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

५,१०२ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने

मलेरिया प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या अँनोफिलीस डासांच्या १७ हजार ६१७ उत्पत्ती स्थानांचा शोध घेतला असता, ५६७ ठिकाणी उत्पत्ती स्थाने आढळून आली. तर डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेण्यासाठी ३ लाख ४५ हजार २१० कंटेनरची तपासणी केली असता ५,१०२ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

१ ते ८ ऑक्टोबर दरम्यान रुग्ण संख्या

मलेरिया - २११

डेंग्यू - २५०

लेप्टो - ११

गॅस्ट्रो - ९२

कावीळ - १३

चिकनगुनिया - ७

स्वाईन फ्लू - १०

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in