

मुंबई : बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे निर्बंध लादलेल्या न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या ठेवीदारांना येत्या २७ फेब्रुवारीपासून २५ हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येतील, असे आरबीआयने जाहीर केले आहे. यामुळे बँकेच्या लाखो खातेदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१३ फेब्रुवारी रोजी आरबीआयने न्यू इंडिया को-ऑप. बँकेवर निर्बंध लादले होते. त्यात बँकेत पैसे भरणे व पैसे काढणे आदींवर निर्बंध लागू केले. यामुळे बँकेचे खातेदार हवालदिल झाले.
बँकेच्या रोखतेविषयी प्रशासकांसोबतच आढावा घेतल्यानंतर आरबीआयने सांगितले की, “प्रत्येक ठेवीदाराला २७ फेब्रुवारीपासून २५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकूण ठेवीदारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना त्यांची संपूर्ण शिल्लक रक्कम काढता येणार आहे आणि उर्वरित ठेवीदार त्यांच्या खात्यातून २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकतात. ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेच्या शाखेत किंवा एटीएमचाही वापर करू शकतात. प्रत्येक खातेदाराला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते.
नवीन सल्लागार समिती स्थापन
आरबीआयने प्रशासकांच्या नेतृत्वाखाली सल्लागार समिती पुन्हा स्थापन केली आहे. ती २५ फेब्रुवारीपासून काम करण्यास सुरुवात करेल. एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक रवींद्र सप्रा, सारस्वत को-ऑप. बँकेचे माजी उपमुख्य महाव्यवस्थापक रवींद्र चव्हाण, सनदी लेखापाल अनंत गोलस यांचा प्रशासकांच्या सल्लागार समितीत समावेश असेल. बँकेच्या व्यवहारावर आरबीआयची बारीक नजर असेल. ठेवीदारांचे हित जपण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आरबीआयने सांगितले.