स्वच्छतादुतांची कामाकडे पाठ नियुक्तीनंतर कामावर येण्यास टाळाटाळ

मुंबई महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर उंचावण्यासाठी स्वच्छतादूत योजना राबवण्यात येत आली.
स्वच्छतादुतांची कामाकडे पाठ नियुक्तीनंतर कामावर येण्यास टाळाटाळ

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने स्वच्छतादुतांची नियुक्ती केली. कंत्राट पद्धतीवर नियुक्ती करण्यात आलेले स्वच्छतादूत कामावर गैरहजर राहतात, सुट्टी घेणार याची आगाऊ सूचनाही देत नाहीत. त्यामुळे कंत्राटी पद्धतीवर घेतलेले स्वच्छतादूत पालिकेसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी स्वच्छतादूत तैनात करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. पालिकेच्या २४ वॉर्डात ५० प्रमाणे १,२०० स्वच्छतादुतांची नियुक्ती करण्याचे निश्चित झाले. कंत्राट पद्धतीवर सहा महिन्यांसाठी स्वच्छतादुतांची नियुक्ती करण्यात येणार, अशी जाहिरातही देण्यात आली.‌ विशेष म्हणजे, कोविड काळात आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या कोरोना योद्धांना स्वच्छतादूत म्हणून सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर सेवेत घेण्यावर शिक्कामोर्तब झाले; मात्र जाहिरात प्रसिद्ध करुनही स्वच्छतादूत पुरवणाऱ्या संस्थांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ७०० ते ८०० स्वच्छतादुतांची नियुक्ती करण्यात आली; मात्र नियुक्तीनंतर कामावर गैरहजर राहणे, सुट्टी घेणार असल्याची आगाऊ सूचना नाही. त्यामुळे एखाद्या भागात स्वच्छतादूत गैरहजर असल्यास दुसऱ्या स्वच्छतादुताचा शोध घेत वर्णी लावणे कठीण होते. पगार झाला, तर दोन दिवस येतच नाही. त्यामुळे नियुक्ती करण्यात आलेले स्वच्छतादूत पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पालिकेसाठी डोकेदुखी

मुंबई महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर उंचावण्यासाठी स्वच्छतादूत योजना राबवण्यात येत आली. पदपथ, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरु नये याची जबाबदारी स्वच्छतादूतांवर सोपवण्यात आली आहे; मात्र नियुक्ती झाल्यानंतर स्वच्छतादूत कामावर गैरहजर असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे स्वच्छतादूत पालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in