३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंग्ज मुंबई मनपाच्या रडारवर आले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

गिरीश चित्रे / मुंबई

घाटकोपर छेडा नगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबईतील बेकायदा होर्डिंग्ज मुंबई मनपाच्या रडारवर आले आहेत. दोन वर्षांत स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने ३० होर्डिंग्जच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती पालिकेचे आयुक्त व प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी दै. 'नवशक्ति'शी बोलताना दिली. दरम्यान, एखाद्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर ते धोकादायक आहे का, याची तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सोमवारी दुपारनंतर वादळीवाऱ्यासह बरसलेल्या पावसाचा तडाखा मुंबईला बसला. ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यात घाटकोपर छेडा नगर येथील १२० बाय १२० फुटांचे बेकायदा होर्डिंग्ज कोसळले आणि १६ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मुंबई परिसरातील व रेल्वे हद्दीतील ४० बाय ४० फुटावरील बेकायदा होर्डिंग्ज हटवण्याचे आदेश मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिल्याचे गगराणी यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन वर्षांत स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ३० होर्डिंग्जच्या नूतनीकरणाला स्थगिती देण्यात आल्याचे गगराणी यांनी सांगितले.

मुंबईतील १०२५ होर्डिंग्ज आहेत. प्रत्येक होर्डिंग्जचा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र ३० ठिकाणच्या होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे या ३० होर्डिंग्जच्या नुतनीकरणाला स्थगिती दिल्याचे डॉ. गगराणी यांनी सांगितले.

दरम्यान, ३० होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने स्थगिती दिली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांकडे अपीलवर सुनावणी होईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गगराणी यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in