कांदिवलीतील नामवंत केटरर बेपत्ता

बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात मोठ्या कर्जाचा उल्लेख केला आहे.
कांदिवलीतील नामवंत केटरर बेपत्ता
PM

मुंबई : कर्जाच्या बोज्याखाली दबलेले कांदिवलीतील नामवंत केटरर हितेश राठोड हे सोमवारपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात मोठ्या कर्जाचा उल्लेख केला आहे.

राठोड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांची चिठ्ठी सापडल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन राठोड बेपत्ता झाल्याची तक्रार केली.राठोड हे गेल्या २५ वर्षांपासून मीरा रोड येथे राहत होते. ते कांदिवलीच्या महावीर नगर येथे यश कॅटरर्स चालवत होते.

राठोड यांनी ११ डिसेंबरला हिंदीत चिठ्ठी लिहिली आहे. तुम्ही कर्मचाऱ्यांनी मला मदत केली. मात्र, आता आपली रजा घेत आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी खूप कर्ज घेतली होती. मी कर्जाच्या खाईत लोटलो आहे. मी माझ्या आयुष्यातील कठीण निर्णय घेत आहे. माझ्याकडे बुकिंग घेतलेल्या सर्व ग्राहकांना याबाबत कळवा. मी आता काहीही करू शकत नाही. मी वैफल्यग्रस्त झालो आहे, अशी चिठ्ठी त्यांनी लिहिली होती.

अनेक कुटुंबीयांनी लग्नाचे कंत्राट यश कॅटरर्सला दिले होते. त्याचे पैसेही भरले होते. आता ते अडचणीत सापडले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला असून राठोड हे नक्कीच परततील, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in