मुंबई : अटल सेतूच्या पोहच रस्त्यावर भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) खडबडून जागे झाले आहे. उलवे येथील पोहच मार्गाच्या डागडुजीचे काम अव्याहतपणे सुरू आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू असून, दुरुस्तीचे काम १२ तासांच्या आत पूर्ण होईल, असा विश्वास एमएमआरडीए प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अटल सेतूच्या पोहच मार्गाला भेगा पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत सरकारला धारेवर धरले. यावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना प्रत्युत्तर दिले. सोशल मीडियावरही याबाबत मिम्स व्हायरल झाले. अटल सेतूला जोडणाऱ्या उलवे येथील पोहोचमार्गावर पडलेल्या भेगांची डागडुजी करण्याचे काम प्रकल्पाच्या पॅकेज ४ चे कंत्राटदार मेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने शुक्रवारी सुरू केले.
पावसातही हे काम अव्याहतपणे सुरू आहे. डागडुजीचे काम पुढील १२ तासांच्या आत पूर्ण करण्यात येणार आहे. उलवे ते मुंबई दिशेकडे जाणाऱ्या पोहच मार्गाची दुरुस्ती वाहतूक विस्कळीत न करता सुरू असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.