मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील त्रुटी सुधारण्याचे काम सुरू; अजित पवार यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

विनायकराव मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबीयांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील त्रुटी सुधारण्याचे काम सुरू; अजित पवार यांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर

“मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ लेनचा करून वारंवार होणाऱ्या अपघातांची ठिकाणे शोधून तेथील दोष दूर केले जातील,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला उत्तर देताना दिले.

मराठा समाजाचे नेते, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या गाडीला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल कुटुंबीयांसह अनेकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यांचे निरसन होण्यासाठी या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सोमवारी विधिमंडळात केली.

अजित पवार यांनी सभागृहात लक्षवेधीवरील चर्चेत सहभाग घेताना सांगितले की, “विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आपल्या सर्वांसाठी धक्कादायक होती. अपघातानंतर त्यांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळाली असती तर ते कदाचित वाचू शकले असते, असे अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी अजित पवार यांनी केली.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातस्थळांचा शोध घेऊन तेथील त्रुटी सुधारण्याचे काम सुरू आहे. त्रुटी दूर केल्यानंतर महामार्गावरची कोंडी व अपघातांची शक्यता कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला. अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश सीआयडीला दिले आहेत. अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांना पोलिसांच्या प्रतिसाद व बचाव कार्यवाहीतील त्रुटी दूर करून प्रशासकीय सुधारणा सुचविण्यास सांगण्यात येईल. मुंबई-पुणे महामार्ग आठपदरी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी विचारविनिमय करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in