
गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात तुंबणाऱ्या मुंबईवर जरा अद्याप तोडगा निघाला नाही, तसाच पावसाळ्यात होणाऱ्या खड्डेमय मुंबईवरही तोडगा निघू शकलेला नाही. सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकारी बदलले, तरीही मुंबईकरांसाठी खड्ड्यांची समस्या मात्र तीच आहे. या पार्श्वभूमीवर आता थेट मुंबई उच्च न्यायालयानेच याची दखल घेतली असून मुंबईतल्या दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा अहवाल स्वत: पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सादर करावा, असे आदेशच न्यायालयाने दिले आहेत.
“मुंबईतील २० दयनीय रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल पालिका आयुक्त चहल यांनी स्वतः न्यायालयात हजर राहून सादर करावेत”, असे न्यायालयाने मुंबई महानगर पालिकेला सांगितले. शिवाय चांगल्या रस्त्यांसाठीचा कृती आराखडा सादर करण्याचेही आदेश न्यायालयाने यावेळी दिले.
मुंबईतील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीसंदर्भात वकील राजू ठक्कर यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सी. जे. दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.