मुंबई : अबुधाबी येथील अलदनाह हॉस्पिटलमध्ये सुमारे २ वर्षांपासून कोमात असलेल्या भारतीय रुग्णाच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिल्ली एम्सला दिले. न्यायमूर्ती ए. एम. चांदूरकर व न्यायमुर्ती फिरदोश पुन्नीवाला यांच्या खंडपीठाने एम्सच्या डॉक्टरांनी अल दनाह अबुधाबी हॉस्पिटलला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.
भारतीय व्यक्ती अलदनाह अबुधाबी हॉस्पिटलमध्ये दोन वर्षांपासून कोमामध्ये असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याचे पालकत्व म्हणून आपल्याला अधिकार द्यावेत, यासाठी त्याच्या पत्नीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. पती हा एकटा कमावता व्यक्ती होता व मागील २ वर्षापासून पत्नी तीन मुलांचा सांभाळ करत आहे. मुंबईतील बँकेचे पतीचे खाते व्यवस्थापित करण्यासाठी पतीचे पालकत्व देण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्या पत्नीने तिचे वकील केन्नी ठक्कर यांच्यामार्फत केली आहे.
यासंबंधी एम्स मेडिकल बोर्ड दिल्ली हे अबुधाबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने संपर्क करून रुग्णाच्या सद्यस्थितिचा आढावा घेतील, तसेच यासाठी केंद्रीय विदेश मंत्रालयाच्या सचिवामार्फत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना याचिकेत अवगत करण्यात करावे, अशी माहीती केंद्र सरकारतर्फे ॲॅड. वैभव गरगडे यांनी हायकोर्टात दिली. याची दखल घेत न्यायालयाने एम्सला निर्देश दिले आहेत.