बँकांमधील फसवणुकीची ९,१०३ प्रकरणे नोंदवली

बँकांमधील फसवणुकीची ९,१०३ प्रकरणे नोंदवली

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)ने शुक्रवारी आर्थिक वर्ष २०२२-२३ चा वार्षिक अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये देशातील वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीच्या पद्धतींचा उल्लेख करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२१च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२ मध्ये बँकिंग फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी या प्रकरणांमध्ये गुंतलेली रक्कम कमी होती. त्यामुळे फसवणुकीची प्रकरणे वाढली असली तरी लोकांचे नुकसान कमी झाले आहे.

बँकांमधील फसवणूक होण्याच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वर्ष २०२२मध्येदेखील बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. अहवालानुसार, बँकिंग फसवणूक, ज्यामध्ये कर्ज घेण्यापासून ते ऑनलाइन व्यवहारापर्यंतच्या प्रकरणांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम कमी होती. त्यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२२मध्ये बँकांनी ६०,४१४ कोटी रुपयांच्या फसवणुकीची ९,१०३ प्रकरणे नोंदवली आहेत.

फसवणूक झालेली

रक्कम तुलनेत निम्मी

आर्थिक वर्ष २०२१च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या ७,३५९ होती, परंतु फसवणूकीची रक्कम १.३८ लाख कोटी रुपये होती. म्हणजेच, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये फसवणूक झालेली रक्कम आर्थिक वर्ष २०२१च्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

आरबीआय अहवालात सामायिक केलेला डेटा दर्शवितो की, खासगी क्षेत्रातील बँकांनी आर्थिक वर्ष २०२२मध्ये सर्वाधिक फसवणुकीची प्रकरणे नोंदवली आहेत. या अहवालात असे दिसून आले आहे की, गेल्या तीन वर्षांपासून खासगी क्षेत्रातील बँकांचा वाटा व्यवहारांच्या संख्येत दरवर्षी वाढत आहे. तरीही, कार्ड आणि इंटरनेट बँकिंग फसवणुकीच्या एकूण प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

आपल्या वार्षिक अहवालात, रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की घाऊक किमतींवर आधारित महागाईचा उच्च स्तर (डब्ल्यूपीआय) आगामी काळात किरकोळ महागाईवर दबाव वाढवेल. त्यात म्हटले आहे की, कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्चात झालेली वाढ, पुरवठा साखळी विस्कळीत होणे यामुळे देशातील महागाईवर परिणाम होत आहे. आरबीआयने म्हटले आहे की, उत्पादित उत्पादनांच्या किमतींमध्ये सतत वाढ होत असताना घाऊक आणि किरकोळ महागाईमधील दरी वाढल्याने, उत्पादन खर्चाचा दबाव काही काळासाठी किरकोळ महागाईवर पडण्याचा धोका आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध हे या समस्येत वाढ होण्याचे कारण असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशातील घाऊक महागाईचा दर एप्रिलमध्ये १५.०८ टक्क्यांच्या उच्चांकावर आहे, तर किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्क्यांच्या आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in