मुंबई : डिजिटल फॉरेन्सिक, केमिकल बायोलॉजी, नॅनोबायोसिस्टम, सस्टेनेबल अग्रीकल्चर, हेल्थ इन्फॉर्मेटिक्स अँड डेटा सायन्स, मटेरिअल फिजिक्स आणि कम्प्युटेशनल मॅथेमॅटिक्स या उदयोन्मुख क्षेत्रातील प्रगत अध्ययन आणि संशोधनाच्या संधीचे दालन आता मुंबई विद्यापीठात खुले होणार आहे.
मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रतिष्ठित इंडियाना विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दुहेरी आणि सह पदवीच्या शिक्षणाला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण इंडियाना विद्यापीठात घेता येईल. त्याचबरोबर तेथील विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह शिष्टमंडळांने इंडियाना विद्यापीठातील चांसलर आणि एक्झिक्युटीव्ह व्हाईस प्रेसिडेंट प्रा. लथा रामचंद यांच्यासह इतर मान्यवरांशी शैक्षणिक सामंजस्यासाठी स्वारस्य दाखविले आहे.
दोन्ही विद्यापीठात झालेल्या शैक्षणिक सामंजस्याच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने अग्रक्रमाने पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील दुहेरी आणि सह पदवीच्या शिक्षणासाठी व उदयोन्मुख क्षेत्रातील संधी आणि गरजा लक्षात घेऊन प्रगत संशोधनासाठी स्वारस्य दाखविले आहे. त्यामुळे दुहेरी आणि सह पदवीच्या शिक्षणाला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचे शिक्षण इंडियाना विद्यापीठात घेता येईल.