बस डेपोंमध्ये निवासी, व्यावसायिक हब मुंबईतील तीन डेपोंचा पुनर्विकास करण्याची महाव्यवस्थापकांची माहिती

या बसगाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दुमजली पार्किंग उभारले जाणार आहे.
बस डेपोंमध्ये निवासी, व्यावसायिक हब 
मुंबईतील तीन डेपोंचा पुनर्विकास करण्याची महाव्यवस्थापकांची माहिती

मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात एसी डबलडेकर बसेसचा ताफा दाखल होत आहे. डबलडेकर बसेस पार्किंग करण्यासाठी तीन डेपोत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. गोवंडी, दिंडोशी, वांद्रे या डेपोत दुमजली पार्किंग व्यवस्थेसह निवासी आणि व्यवसायिक हब उभारण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी दिली.

बेस्ट बसेसना मिळणारी प्रवाशांची पसंती लक्षात घेता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमातर्फे इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात सामील करून घेतल्या जात आहेत. बसेस पार्किंग करण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे बस आगारात दुमजली पार्किंग उभारल्यास, बसेस पार्क करणे शक्य होणार आहे. भविष्यात बस गाड्या पार्किंगसाठी जागेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याचा विचार करून बेस्टने दुमजली बस पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गोवंडी, दिंडोशी आणि वांद्रे हे तीन आगार दुमजली पार्किंगसाठी निवडण्यात आले आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे सिंघल यांनी सांगितले.

या बसगाड्यांच्या पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दुमजली पार्किंग उभारले जाणार आहे. तसेच डेपोचा पुनर्विकास करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी) ही वर्ल्ड बँकेची सल्लागार असलेली कंपनी या सर्वाचा अभ्यास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in