
मुंबई : महाकाली रोड येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास राम बाग सोसायटीवर दरड कोसळली. दगड, मातीचा ढिगारा पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर घुसला. जोरदार आवाजामुळे रहिवाशांची झोपच उडाली. दरम्यान, मोठी दुर्घटना टळली असून, सुरक्षेसाठी इमारतीमधील १६८ घरांमधील रहिवाशांना तात्काळ नजीकच्या महापालिका शाळेतील जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. अंधेरी (पूर्व), महाकाली रोड, गुरुनानक शाळेजवळ, राम बाग सोसायटी या ठिकाणी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास डोंगराची दरड अचानकपणे बाजूच्या राम बाग सोसायटीच्या संरक्षक भिंतीवर कोसळली. इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यापर्यंत माती दगड पडले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पालिका विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान आणि स्थानिक पोलीस यांनीही तात्काळ घटनस्थळी धाव घेतली. दुर्घटनेची भीषणता पाहता इमारतीतील १६८ रहिवाशांना पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.