स्लम एरियातील रहिवाशांना आता घराजवळच उपचार मिळणार

मुंबईतील १ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.
स्लम एरियातील रहिवाशांना आता घराजवळच उपचार मिळणार

स्लम एरियातील म्हणजेच झोपडपट्ट्यांतील रहिवाशांसाठी आता घराजवळच दवाखाने सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. मुंबईत असलेल्या झोपडपट्ट्यांपैकी ४० ठिकाणांची निवड करण्यात आली असून सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत दवाखाने सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे या दवाखान्यात डॉक्टरांना मानधनाबरोबर बोनसही दिला जाणार आहे. एका डॉक्टरने ४० रुग्णांनंतर जितके रुग्ण तपासले, त्यासाठी प्रति रुग्ण अतिरिक्त ४० रुपये देणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

मुंबईतील १ कोटी ३० लाख लोकसंख्येपैकी ६० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. झोपडपट्टी असो वा उच्च इमारतीत राहणारे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई महापालिका नेहमीच विविध उपाययोजना राबवत असते. मुंबई महापालिकेचे १८५ दवाखाने असून सध्या अस्तित्वात असलेले दवाखाने सायंकाळी ३ वाजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे स्लम एरियातील रहिवाशांना खासगी रुग्णालय किंवा पालिकेच्या रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यामुळे त्यांचा पैसा व वेळ दोन्ही वाया जाते. त्यामुळे विशेष करून स्लम एरियातच दवाखाने सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असलेल्या दवाखान्यांपासून काही अंतरावर पोटा कॅबिन तयार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पोटा कॅबिन दवाखाने सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे संजीवकुमार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in