वाहतूक बेटाच्या आकार वाढीस खारवासियांचा विरोध ;नागरिक, दुकानदारांची पालिकेकडे तक्रार

मोठ्या वाहतूक बेट उभारणीस पालिकेने नागरिकांकडून कोणत्याही हरकती व सूचना घेतलेल्या नाहीत. कुठलेही सूचनाफलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत.
वाहतूक बेटाच्या आकार वाढीस खारवासियांचा विरोध ;नागरिक, दुकानदारांची पालिकेकडे तक्रार

मुंबई : खार पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील रोड क्रमांक १ येथील जुने वाहतूक पाडून त्या जागी नवे मोठे आकाराचे वाहतूक बेट बांधण्यात येणार आहे; मात्र नवीन वाहतूक बेट झाल्यावर बेस्टच्या बसेस व रिक्षा टॅक्सी वळवण्यात अडचण येणार आहे. त्यामुळे नवीन वाहतूक बेटाला खार मधील दुकानदार, नागरिकांनी विरोध केला असून पालिकेला तक्रार केली आहे.

खार रेल्वे स्थानकाबाहेर पालिकेचे जुने वाहतूक बेट होते. या बेटाच्या डावीकडून खार रेल्वे स्थानकाजवळच्या बेस्ट थांब्यांकडे जाण्यासाठी मार्ग होता. हा मार्ग बंद करून मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत रस्त्यावर पालिकेतर्फे मोठे वाहतूक बेट बांधले जात आहे. खार पश्चिम हा खारदांडा, गझधर बांध, नारळी आग्रीपाडा तसेच च्युईम गाव अशा मोठ्या वस्त्यांचा विभाग आहे. या भागातून रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठी बेस्ट बस वाहतूक व शेअर रिक्षा हाच पर्याय आहे. या रस्त्यावर शेअर रिक्षा स्टँड असून, त्याठिकाणी प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. सायंकाळी या रस्त्यावर लोकांची मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिक, वाहनचालक, रिक्षाचालक, बेस्ट, दुकानदार यांना विश्वासात न घेता वाहतूक बेट बांधण्याचे काम सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या बेटा जवळचा रस्ता बंद केल्यामुळे बस वळवण्यास विलंब होत असून खार पश्चिम रोड क्र. १ पासून एस.व्ही. रोडपर्यंत वाहनाच्या रांगा लागत आहेत. वाहतूक बेटाने अधिक जागा व्यापल्याने चिंचोळा मार्ग तयार होवून वाहने आणि प्रवाशांच्या गर्दीमेळे वाहतुकीची दैना उडाली आहे. खार येथील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख प्रफुल्ल घरत यांनी या प्रकरणी पालिकेचे वांद्रे/एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त व बेस्टच्या वांद्रे पश्चिम बस आगार व्यवस्थापकांना पत्र पाठवून बेट पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. पालिका आयुक्तांनी मुंबईतील कुठल्याही वाहतुकीच्या रस्त्यावर बांधकाम न करण्याबाबतचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले असताना पालिकाच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे घरत यांनी म्हटले आहे.

वाहतुकीसाठी रस्ता अपुरा

याबाबत बेस्टने रस्त्यावर बांधण्यात येणाऱ्या वाहतूक बेटास पालिकेकडे तक्रार करून हरकत घ्यावी व जुने बेट पूर्ववत करून बेस्ट वाहतूक सुरळीत होण्यास सहकार्य करावे, अशी विनंती घरत यांनी केली आहे. तर वाहतूक बेटामुळे चालण्यास व वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडू लागला आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणखी त्रासदायक स्थिती निर्माण होणार असल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले.

सुरक्षेची उपाययोजना नाही

मोठ्या वाहतूक बेट उभारणीस पालिकेने नागरिकांकडून कोणत्याही हरकती व सूचना घेतलेल्या नाहीत. कुठलेही सूचनाफलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाहीत. काम चालू झाल्यानंतरही त्या ठिकाणी दोन बेरिकेटस् वगळता सुरक्षेची उपाययोजना करण्यात आलेली नाही. वाहतूक बेट हे चार रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी किंवा पालिकेच्या वापरात नसलेल्या ठिकाणी बनविण्यात येतात असे असताना नागरिकांची गैरसोय होईल अशा ठिकाणी हे वाहतूक बेट बांधण्यात येऊ नये अशी, मागणी करत येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे यांनी या बेटास विरोध दर्शवण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहिम सुरू करण्यात आल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in