
धैर्य गजरा/मुंबई
गेटवे ऑफ इंडियाजवळील नवीन जेट्टीच्या उभारणीला स्थानिक रहिवाशांचा जोरदार विरोध होत आहे. या रहिवाशांच्या मागणीला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, खासदार अरविंद सावंत आणि आमदार अबू आसीम आजमी यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे. गेटवेच्या जवळ जेट्टी होणार नाही, असे आश्वासन या नामवंतांनी दिले.
शनिवारी गेटवे ऑफ इंडियाजवळ नव्या व्हीव्हीआयपीकरिता जेट्टीच्या बांधकामाला विरोध करण्यासाठी रहिवासी काळे कपडे घालून रस्त्यावर उतरले. कुलाब्यातील रिअल पार्टी हॉलवर एकत्र येऊन नवीन जेट्टीचे काम करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जेट्टीविरोधी आंदोलनाला सहभाग दर्शवताना या राजकीय नेत्यांनी हस्ताक्षर केले.
नार्वेकर म्हणाले की, मी आंदोलकांसोबत आहे. चार वर्षांपूर्वी आर्थर रोडजवळील अशाच जेट्टीला विरोध करणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. गेटवेजवळ जेट्टी करण्यापेक्षा प्रिन्सेस डॉकवर जेट्टी तयार करणे अधिक योग्य ठरेल, जेणेकरून एकाच ठिकाणी एकत्रित जलवाहतूक प्रणाली तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
पण, राजकीय नेत्यांच्या आश्वासनावर रहिवाशांचा विश्वास नाही. आपण जनतेसोबत असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. तरीही त्यांनी प्रकल्प थांबवण्याची खात्री दिलेली नाही. या जेट्टीचे काम पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही सभा घेतलेली नाही. आम्ही केलेल्या आंदोलनामुळे आम्हाला विधानसभेत बोलावण्यात आले, असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
मुंबई सागरी मंडळाने संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक परवानग्या घेतल्या नाहीत. तसेच निर्माण कार्यासाठी विविध नियमांचे पालन केले नाही. याबाबत ते पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात जाऊन बांधकामावर स्थगिती आणण्यासाठी याचिका दाखल करणार आहेत. तसेच रहिवाशांनी येत्या १० एप्रिल रोजी राज्याचे मंत्री नितेश राणे यांची भेट घेण्याचे ठरवले आहे.
गेटवेचे संरक्षण करणे आवश्यक
गेटवे ऑफ इंडिया हे एक वारसा आणि ऐतिहासिक स्थळ आहे जे देशाच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहे. ते देशासाठी अभिमानास्पद आहे. या स्थळाचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे, असे नार्वेकर म्हणाले.