

मुंबई : इंग्लंडमध्ये १९३७ मध्ये निर्मित आणि १९४४ मध्ये मुंबई बंदरातील (मुंबई डॉक) मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या ऐतिहासिक 'टर्न टेबल शिडी' असलेल्या वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आले आहे. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी आज सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई महापालिका मुख्यालय येथे अनावरण करण्यात येणार आहे.
मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक गौतम सिंघानिया उपस्थित राहणार आहेत.
'टर्न टेबल शिडी' असलेल्या या ऐतिहासिक अग्निशमन वाहनाची १९३७ साली इंग्लंडमधील लेलँड या कंपनीत निर्मिती करण्यात आली तर २४ सप्टेंबर १९४१ रोजी मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ते समाविष्ट करण्यात आले. तत्कालीन उंच इमारती, गोदामे तसेच बंदर परिसरातील उंच भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ही अत्याधुनिक शिडी मानली जायची. ही शिडी पूर्णतः लोखंडी संरचनेत तयार करण्यात आली होती. ती हाताने, साध्या यांत्रिक पद्धतीने फिरवता यायची.
मुंबई बंदरात (मुंबई डॉक) १४ एप्रिल १९४४ रोजी उभ्या असलेल्या एस. एस. फोर्ट स्टिकिन हे दारुगोळा, स्फोटके, इंधन आणि युद्धसामग्रीने हे जहाज भरलेले होते. त्यामुळे जहाजावरील आगीने रौद्ररूप धारण केले होते.
नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जुने भाग बनवले
अनेक दशकांपासून बंद असलेले हे वाहन पुन्हा सुरू करणे, वाहनाची झिजलेली यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाहनाचे मूळ सुटे भाग (स्पेअर पार्ट्स) मिळवणे अत्यंत जिकरीचे कार्य होते. त्यासाठी तत्कालीन तांत्रिक नोंदी, आराखडे आणि संदर्भ शोधण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक सुट्या भागांची संरचना (डिझाइन) तयार करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सुटे भाग नव्याने बनवण्यात आले. आता हे वाहन रस्त्यांवर दिमाखात धावण्यास सज्ज आहे.