सोयीसुविधांनी युक्त प्रसाधनगृह चेंबूरकरांच्या सेवेत ; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण

पिण्याचे स्वच्छ पाणी, धुलाई मशीन, सौरऊर्जापाण्याच्या पुनर्वापरामुळे वर्षाला ५० लाख लिटर पाण्याची बचत
सोयीसुविधांनी युक्त प्रसाधनगृह चेंबूरकरांच्या सेवेत ; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण
Published on

मुंबई : सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, पॅडची विल्हेवाट लावणारे संयंत्र, पिण्याचे स्वच्छ पाणी, धुलाई मशीन, सौरऊर्जा अशा विविध सोयीसुविधांसह चेंबूर पश्चिम पंजाबी चाळ येथे पाच हजार लोकांच्या सेवेत शौचालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सौरऊर्जेचा वापर केल्याने वीजेसाठी होणाऱ्या खर्चात ७५ टक्के बचत होईल. तसेच पाण्याच्या पुनर्वापरामुळे वर्षाला ५० लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी या शौचालयाचे लोकार्पण झाले. अत्याधुनिक सुविधांसह शौचालयाची निर्मितीही लोकसहभागातून होऊ शकते, तसेच हे मॉडेल यशस्वी होऊ शकते, असे गौरवोद्गार लोढा यांनी यावेळी काढले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम. पश्चिम विभागात पंजाबी चाळ येथे पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीसाठी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी यांच्या सामाजिक दायित्व जबाबदारी (सीएसआर) उपक्रमाच्या माध्यमातून ६४ शौचकुपे असलेल्या शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये शौचालयासोबतच स्वच्छ पाणी, कपडे धुलाई संयंत्र आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत. महिलांसाठी २८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालयदेखील उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी आपत्कालीन स्थितीसाठी पॅनिक बटन आणि सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनदेखील पुरवण्यात आले आहे.

सॅनिटरी पॅड विल्हेवाट लावणारे संयंत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. पुरुषांसाठी ३८ शौचकुपे असणारे स्वतंत्र शौचालय आहे. त्याठिकाणी हात स्वच्छ धुण्यासाठी तसेच पाय धुण्याचीही स्वतंत्र व्यवस्था आहे. दोन्ही शौचालयांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा लावलेली आहे. नाममात्र शुल्क देवून नागरिकांना शौचालय, स्वच्छ पाणी तसेच लॉण्ड्री सुविधेचा वापर करता येणार आहे. या प्रसाधनगृहाच्या देखभालीसाठी एकूण दहा स्थानिक व्यक्तिंना याठिकाणी रोजगार उपलब्ध झाला आहे.

महिला आणि पुरुष अशा दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. तर केंद्रप्रमुख आणि लॉण्ड्री व्यवस्थापक अशा पद्धतीने १२ जणांचे पथक याठिकाणी देखभाल आणि सेवेसाठी कार्यरत असेल. सदर केंद्रामध्ये वापरात येणाऱ्या यंत्रांसाठी आणि अंतर्गत दिव्यांच्या व्यवस्थेसाठी दोन्ही इमारतींवर मिळून १९ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा (सोलार) पॅनेलही लावण्यात आले आहेत. त्यामुळे विजेवर होणारा ७५ टक्के खर्च कमी होण्यासाठी मदत होईल.

५० लाख लिटर पाण्याची बचत!

शौचालयाच्या इमारतीत आरओ वॉटर प्लांट आणि पाणी पुनर्प्रक्रिया करणाऱ्या प्लांटचाही समावेश आहे. स्वच्छता आणि फ्लशसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरामुळे वर्षांला ५० लाख लिटर पाण्याची बचत याठिकाणी करणे शक्य होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in