२,३६९ ग्रामपंचायतींचा आज निकाल ;सर्वत्र शांततेत सुमारे ७४ टक्के मतदान

राज्यात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने त्यांची धार अधिक तीव्र झाली आहे.
२,३६९ ग्रामपंचायतींचा आज निकाल ;सर्वत्र शांततेत सुमारे ७४ टक्के मतदान

मुंबई :महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका विविध कारणांनी रखडलेल्या असतानाच ग्रामीण महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट करणाऱ्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत सुमारे ७४ टक्के मतदान झाले. रिक्त असलेल्या १३० सरपंचपदांसाठीच्या निवडणुकाही सोबतच पार पडल्या आहेत. राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, नुकतेच झालेले मराठा आरक्षणाचे आंदोलन तसेच तोंडावर आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या या निवडणुकांना महत्त्व आले आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोणाच्या नशिबी गुलाल आणि कोणाच्या हातात फक्त धुरळा हे सोमवारी निकालानंतर स्पष्ट होईल.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्या तरी राजकीय पक्ष विविध पॅनलच्या आडून आपले शड्डू ठोकतच असतात. त्यातच राज्यात झालेल्या राजकीय भूकंपांनंतर राजकीय परिमाणे मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. नुकतेच राष्ट्रवादीत अजित पवार गट वेगळा होऊन सत्तेत सहभागी झाला. शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट हे वॉर विविध पातळ्यांवर सुरू आहेच. त्यातच महत्त्वाच्या ठरणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुका विविध कारणांनी रखडल्याने बदलत्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचे समाजमन कोणाच्या सोबत आहे, हे स्पष्ट झाले नाही. नुकतेच मराठा आरक्षणासाठी देखील तीव्र आंदोलन झाले. त्याचाही बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कानोसा घेणे आवश्यक ठरणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींमधील २ हजार ९५० सदस्यांसाठी ही निवडणूक पार पडली. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत मतदान पार पडले. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी तीन या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. नक्षलग्रस्त भाग वगळता मतमोजणी लगेचच दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबर रोजी, तर नक्षलग्रस्त भागात ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

राजकीय कल देणाऱ्या निवडणुका

राज्यात सध्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने त्यांची धार अधिक तीव्र झाली आहे. पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्याच्या सुमारास लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास विधानसभा निवडणुका होतील. सत्ताधारी भाजपप्रणीत महायुती तर विरोधातील महाविकास आघाडी यांच्यात या लढती होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट राजकीय पक्षांचे बलाबल समजणार नसले तरी एकूणच बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचा कौल कोणाकडे झुकतो आहे, याचा अंदाज मात्र लावता येऊ शकेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in