डिजिटल डिटेन्शन स्कॅमची महिला ठरली बळी; निवृत्त महिला डॉक्टरला २.८९ कोटींचा गंडा

मुंबईतील ७० वर्षीय निवृत्त महिला डॉक्टर एका अत्यंत योजनाबद्ध डिजिटल डिटेन्शन (खोट्या अटकेचा) स्कॅमच्या बळी ठरल्या आहेत. सायबर फसवेखोरांनी स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवत या महिलेला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले आणि त्यांची एकूण २.८९ कोटी रुपयांची फसवणूक केली.
डिजिटल डिटेन्शन स्कॅमची महिला ठरली बळी; निवृत्त महिला डॉक्टरला २.८९ कोटींचा गंडा
Published on

पूनम अपराज / मुंबई

मुंबईतील ७० वर्षीय निवृत्त महिला डॉक्टर एका अत्यंत योजनाबद्ध डिजिटल डिटेन्शन (खोट्या अटकेचा) स्कॅमच्या बळी ठरल्या आहेत. सायबर फसवेखोरांनी स्वतःला सरकारी अधिकारी असल्याचे भासवत या महिलेला मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले आणि त्यांची एकूण २.८९ कोटी रुपयांची फसवणूक केली.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणुकीचा या प्रकाराला २८ मे रोजी सुरुवात झाली. पीडित महिलेला 'टेलिकॉम विभागातील' अमित कुमार असे भासवणाऱ्या एका व्यक्तीकडून फोन आला. त्याने त्यांना सांगितले की त्यांच्या आधार कार्डाचा गैरवापर करून नवीन सिम कार्ड काढले गेले असून, त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

यानंतर तिला व्हॉट्सअॅपवर "सायबर क्राइम डिपार्टमेंट, मुंबई" चा बनावट अधिकारी म्हणवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडून तिची ओळख पटवण्यासाठी माहिती मागवण्यात आली. त्यानंतर पीडित महिलेला मुंबई गुन्हे शाखेतील आयपीएस अधिकारी समाधान पवार असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीकडून व्हिडीओ कॉल आला. तेव्हा तर या पीडित महिलेची घाबरगुंडीच उडाली. त्या पार गर्भगळीत झाल्या.

तिचा विश्वास बसावा यासाठी, फसवेखोरांनी उच्च न्यायालय, अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या बनावट कागदपत्रांची छायांकित प्रती पाठवल्या, ज्या खोट्या पण अधिकृत वाटाव्यात अशा तयार करण्यात आल्या होत्या. तिला अटक होईल या भीतीने आणि या कागदपत्रांवर विश्वास ठेवून, त्या डॉक्टरांनी त्यांच्या आयुष्यभराची बचत फसवेखोरांनी दिलेल्या खात्यांमध्ये "चौकशीसाठी" ट्रान्सफर केली. एक आठवड्याच्या कालावधीत त्यांनी एकूण २.८९ कोटी ट्रान्स्फर केले.

महिलेच्या पतीने ही बाब एका नातेवाइकाला बोलता बोलता सांगितली त्यानंतरच ही फसवणूक उघडकीस आली. नातेवाईकाने यामागे फसवणूक असण्याची शक्यता सांगितली. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली. आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

तीन वर्षांच्या शिक्षेची घातली भीती

स्वतः ला आयपीएस अधिकारी भासवणाऱ्या इसमाने या महिलेला व्हिडीओ कॉल केला. सुमारे १४ तास चाललेल्या कॉलमध्ये, त्या फसवेखोराने तिला उद्योजक नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. त्याने सांगितले की, गोयल यांच्या घरी झालेल्या छाप्यात तिच्या नावाने चालवलेले बँक खाते व डेबिट कार्ड सापडले. पीडित महिलेने या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्यावरही तो तोतया अधिकारी काही ऐकायला तयार नव्हता. अवैध पैशाचा एक रुपया जरी तुमच्या खात्यात आढळला, तरी तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे त्याने महिलेला सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in