निवृत्त मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट महिलेला गंडा

दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निवृत्त मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट महिलेला गंडा

मुंबई : बँकेत लोनच्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी आलेल्या एका ६४ वर्षांच्या निवृत्त विशेष मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट महिलेकडील ३६ हजाराची कॅश चोरी करून पळून गेलेल्या एका भामट्याला अखेर विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. फिरोज फय्याज खान असे या आरोपीचे नाव असून त्याच्या दुसर्‍या सहकाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत. दोन्ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार वृद्ध महिला विशेष मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचे एका खासगी बँकेत एफडी लोन सुरू असून, या लोनचे हप्ते त्या दरमहिन्यांच्या १५ तारखेला स्व: त बँकेत जाऊन भरतात.

१७ ऑगस्ट २०२३ रोजी त्या नेहमीप्रमाणे लोनचे मासिक हप्ते भरण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. कॅश काऊंटरमधील रांगेत उभ्या असताना त्यांच्या मागे दोन तरुण होते. त्यापैकी एकाने त्यांना पैसे भरण्याच्या स्लिपमध्ये तुम्ही नोटांचे नंबर लिहिले नाहीत, ते कसे लिहायचे मी तुम्हाला सांगतो, असे सांगून त्यांच्याकडील एक लाख रुपयांची कॅश घेतली होती. काही वेळानंतर नंबर लिहून त्यांनी ती कॅश त्यांना परत केली होती. त्यानंतर ते दोघेही बँकेत बाहेर निघून गेले होते. कॅशिअरकडे पैसे दिल्यानंतर त्याने ती रक्कम ६२ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी एक लाख रुपये असल्याचे सांगून पुन्हा त्यांच्याकडील नोटा मोजण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती कॅश ६२ हजार रुपये होती. रांगेत उभ्या असलेल्या दोन्ही ठगांनी नोटा लिहून देण्यास मदत करतो असे सांगून त्यांच्याकडील ३८ हजाराची कॅश पळवून नेली होती.

logo
marathi.freepressjournal.in