मुंबईवर सूड उगवला जात आहे! शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांचा घणाघात

मुंबईच्या ताटातील घास काढून गुजरातचा विकास का करता? मुंबईवर अशा प्रकारे सूड का उगवला जात आहे?, असा घणाघात शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केला.
मुंबईवर सूड उगवला जात आहे! शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांचा घणाघात

मुंबई : मुंबईमधील सर्व महत्त्वाचे उद्योगधंदे आणि कार्यालये केंद्र सरकारतर्फे गुजरातमध्ये स्थलांतरित केली जात आहेत. आमचा गुजरातच्या विकासाला विरोध नाही. तेही देशातील एक राज्य आहे आणि त्याचाही विकास झालाच पाहिजे. मात्र, मुंबईच्या ताटातील घास काढून गुजरातचा विकास का करता? मुंबईवर अशा प्रकारे सूड का उगवला जात आहे?, असा घणाघात शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अरविंद सावंत यांनी गुरुवारी येथे केला.

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी गुरुवारी नवशक्ति आणि फ्री प्रेस जर्नलच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तेव्हा नवशक्ति आणि फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी, संचालक अभिषेक कर्नानी व व्यवस्थापकीय संपादक जी. एल. लखोटिया यांनी त्यांचे स्वागत केले आणि मुंबईसह देशाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी शिवसेनेची फूट, देशातील सध्याचे राजकारण, देश आणि मुंबईपुढील प्रश्न आदी बाबींचा विस्तृत उहापोह केला.

देशापुढील ज्वलंत प्रश्न

मुंबई आणि देशापुढील ज्वलंत प्रश्नांबाबत विचारले असता, राष्ट्रीय सुरक्षा, महिलांची सुरक्षा, महागाई, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, शेतकऱ्यांचे प्रश्न, चीनची घुसखोरी, मणिपूरमधील हिंसाचार आदी प्रमुख प्रश्न असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले. चीनने जम्मू-काश्मीरच्या लडाख प्रदेशात घुसखोरी करून तेथील ६५ लष्करी ठाणी काबीज केली आहेत. चिनी सैन्य प्योंग्यांग-त्सोपर्यंत घुसले आहे. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांचे आंदोलन सुरू असताना देशातील एकही प्रसारमाध्यम त्याची दखल घेत नाही. केंद्र सरकारने देशाच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांची धोरणे सर्वसामान्यांना न्याय देणारी नाहीत. असे असताना भाजप कित्येक दशकांपूर्वी काँग्रेसने कच्छथिवू बेट श्रीलंकेला दिल्याचा मुद्दा उकरून काढते, ही गंभीर बाब आहे.

महिलांचा अनादर

देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विचार केला तर मणिपूरमधील हिंसाचार आणि तेथे झालेला महिलांचा अनादर ही देशाला कलंक लावणारी घटना होती. मी मणिपूरला भेट दिली होती. तेव्हा मला ते राज्य दुभंगलेले दिसून आले. तरीही पंतप्रधानांनी मणिपूरला अजूनही भेट दिलेली नाही. ते शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही अशीच अनास्था आहे. देशासाठी पदक मिळवलेल्या महिला कुस्तीपटूंनी संसदेबाहेर आंदोलन करूनही दोषींवर कारवाई होत नाही. आता तर ते मंगळसूत्रावर बोलू लागले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले.

बेरोजगारी ८३ टक्क्यांवर

देशातील लोकसंख्येचा प्रश्न गंभीर आहे. त्या लोकसंख्येला जगवणे हे सरकारचे काम आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात अनेक उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले गेले. सरकारी क्षेत्रातील उद्योगांनी नागरिकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या सरकारने निर्गुंतवणुकीच्या नावाखाली सर्व सरकारी उद्योगधंदे मोडीत काढायला सुरुवात केली आहे. तरुणांमधील बेरोजगारी ८३ टक्क्यांवर पोहोचली आहे. हे अभूतपूर्व आहे. हे सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी किमान हमीभाव (एमएसपी) देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांच्या काळात ७०० शेतकऱ्यांचा जीव गेला आहे आणि हे शेतकऱ्यांना खलिस्तानवादी ठरवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

विद्यार्थ्यांमधील विषमता वाढीस

केंद्र सरकारच्या शिक्षणाच्या हक्क कायद्याला (राइट टू एज्युकेशन ॲक्ट) आम्ही विरोध केला. कारण आम्हांला तो कायदा विषमतावादी वाटतो. आम्ही दर्जेदार शिक्षणाच्या हक्काचा (राइट टू क्वालिटी एज्युकेशन) पुरस्कार करतो. आज वेगवेगळ्या शैक्षणिक बोर्डांमुळे विद्यार्थ्यांमधील विषमता वाढली आहे. सीबीएई बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना न्यूनगंड वाटतो. ही विषमता का निर्माण करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही मुंबईच्या मनपाच्या शाळांमध्ये सीबीएसईच्या दर्जाचे शिक्षण दिले. तेच धोरण संपूर्ण राज्यातील सरकारी शाळांत राबवण्याचा आमचा मानस आहे, असेही ते म्हणाले.

हे स्वप्नातही वाटले नव्हते!

शिवसेनेच्या फुटीबाबत प्रश्नावर उत्तर देताना सावंत म्हणाले की, असे काही घडेल हे आम्हाला कधी स्वप्नातही वाटले नाही. कारण शिवसेनेत आमचा निष्ठेवर विश्वास आहे. ठाकरे कुटुंबीय जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवते तेव्हा ते तुम्हाला आपल्या घरच्यांसारखे वागवते. ते आमचे एकत्रित कुटुंब आहे. त्यामुळे अशी गद्दारी घडेल याची आम्हांला शंकाही आली नाही. यापूर्वी शिवसेनेतून कोणी बाहेर पडले नव्हते असे नाही. अनेक जण पक्ष सोडून गेले. जेव्हा नारायण राणे बाहेर पडले तेव्हा गोष्ट वेगळी होती. त्यांना पक्षाने बाहेर काढले होते. पण यावेळी कट इतका गहिरा आणि छुपा होता की, त्याची आम्हांला जाणीवसुद्धा झाली नाही.

दोन दिग्गजांना उद्धव भिडताहेत!

आज देशात मोदी-शहा यांची हुकूमत असताना उद्धव ठाकरे त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले आहेत. देशातील दोन दिग्गजांना उद्धव भिडत आहेत हे त्यांचे मोठे धाडस आहे, असेही सावंत यांनी नमूद केले.

शिवसेनेची पाळेमुळे खोलवर घट्ट रुजलीत

'शतप्रतिशत भाजप' हा भाजपचा छुपा अजेंडा आहे. त्यांना अन्य कोणाचे अस्तित्वच मान्य नाही. 'उखाड देंगे' ही गृहमंत्र्यांची भाषा होती. २०१४ नंतर त्यांनी खरी नखे दाखवायला सुरुवात केली. वर जाण्यासाठी जी शिडी वापरायची तीच नंतर मोडून टाकायची, अशी त्यांची रीत आहे. शिवसेना संपेल असे त्यांना वाटले होते. पण त्यांनी शिवसेनेला ओळखले नाही. शिवसेनेची पाळेमुळे खोलवर घट्ट रुजली आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे भोळ्या शंकराप्रमाणे होते. पण त्याच शंकराने तिसरा डोळा उघडला की काय घडते हे सर्वाना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हयात होते तोवर अष्टप्रधान मंडळ धाकात होते. छत्रपती संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाला ओळखले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी हे बारभाईचे कारस्थान ओळखले आहे. पूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना निवडणुकीत त्यांच्या महाराष्ट्रात फार तर दोन-तीन सभा होत असत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. मात्र, पुढील निवडणुकीत पंतप्रधानांना राज्यात २७ सभा घ्याव्या लागल्या. भुजबळांबरोबर बाहेर गेलेल्या २३ जणांचे काय झाले त्याचा विचार करा. त्यांच्याकडे पैशाचे बळ आहे. पण नैतिक बळ कुठे आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

मुंबई बंदर, जेएनपीएकडे दुर्लक्ष

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर (आयएफएससी) मुंबईत असणे सयुक्तिक होते. मात्र, ते येथून हलवण्यात आले. वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस, डायमंड पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले. तुम्ही गुजरातमधील मुंद्रा बंदराच्या विकासाच्या गोष्टी करता, पण मुंबई बंदराच्या विकासाकडे दुर्लक्ष करता. तेथील गाळ काढून बंदराची खोली वाढवण्याकडेही लक्ष देत नाही. मुंद्राच्या तुलनेत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीची (जेएनपीए) कामगिरी कितीतरी उजवी असून त्याकडे लक्ष दिले जात नाही. मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनी विकल्या जातात. येथील चाळींमधील रहिवाशांना पक्की घरे देण्याचे वचन दिले होते. पण ते पाळले जात नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in